नवी दिल्ली : DRDO च्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अॅन्ड अलाईड सायन्सेसने हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या मदतीने तयार केलेलं कोरोना विरोधी औषध 2 डीजी आजपासून उपलब्ध होणार असून याच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या हस्ते करण्यात येत आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे. 


 




DRDO ने  हैदराबादच्या डॉक्टर रेड्डीजच्या लॅबमध्ये 10 हजार डोस तयार केले गेले आहेत. डॉक्टर रेड्डीज लॅब जून महिन्यापासून दर आठवड्याला एक लाख डोसची निर्मिती करण्यास सुरवात करणार आहे. पाण्यात विरघळली जाणारी ही औषधे लवकरच इतर रुग्णालयातही उपलब्ध होऊ शकतात.


ऑक्सिजनची कमी गरज
DRDO च्या या औषधांचे 10 हजार डोस तयार करण्यात आले असून आजपासून DRDO च्या रुग्णालयात ते उपलब्ध होणार आहेत. क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, या औषधाचे सेवन केल्यानंतर कोरोनाबाधित  रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना ऑक्सिजनची गरजही कमी लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत. 


गेल्या वर्षापासून औषधावर संशोधन सुरु
या औषधावर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून संशोधन सुरु असल्याचं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. DRDO ने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप किंवा इंजेक्शन नाही तर पावडर स्वरुपात पाकिटामध्ये  मिळते. हे औषध पाण्यातून सेवन करता येतं. हे औषध विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. 


देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. अशा वेळी DRDO ने विकसित केलेले हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते असा दावा केला जात आहे. हे औषध केवळ रुग्णालयांत मिळणार असून याची विक्री मेडिकल स्टोअरमध्ये होणार नाही असं DRDO च्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :