नवी दिल्ली : देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी आहे. मोदी सरकारशी मतभेद झाल्यानंतर अरविंद सुब्रह्मण्यम यांनी या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यांच्या जागेवर कृष्णमूर्तींची नियुक्ती केली आहे.

हे महत्त्वाचे पद भरण्यासाठी सरकारने 30 जून रोजी अर्ज मागवले होते. आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.


हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ऍनालिटिकल फायनान्स विभागात ते सध्या कार्यकारी संचालक आहेत. शिकागोमधून सुब्रमण्यम यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. तसेच आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतले आहे. सुब्रमण्यम यांची गणना जगातील उच्च स्तरीय बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक पॉलिसी तज्ज्ञांमध्ये होते.

सेबीच्या कॉर्पोरेट गवर्नन्स तज्ज्ञांची समिती आणि आरबीआयसाठी बँकांच्या गव्हर्नन्सचे काम करणाऱ्या समितीचा भाग असण्याबरोबर कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि भारतात बँकिंग सुधारणांसाठी त्यांना ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरणाचे तज्ञ म्हणून डॉ. सुब्रह्मण्यम यांचा लौकिक आहे.