मुंबई : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 11 डिसेंबरला सर्वच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदार राजाचा कौल पाहायला मिळत आहे. भाजपच्या हातातली दोन मोठी राज्यं निसटण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची चिन्हं आहेत.


एबीपी न्यूज, लोकनीती आणि सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार 15 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात यंदा सत्ताधाऱ्यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस भाजपच्या हातून सत्ता खेचण्यात यशस्वी ठरणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

राजस्थान आपली परंपरा कायम राखणार असल्याचंही एबीपी न्यूज, लोकनीती आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं राज्य खालसा होणार असून, काँग्रेस सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत.

सलग तीन टर्म सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये मात्र यंदाही भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरण्याची चिन्हं आहेत. अजित जोगी आणि मायावती यांच्या आघाडीचा फटका काँग्रेसला बसल्याचं पोलमध्ये दिसत आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याचं सर्वेक्षणात दिसत आहे.

दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या तेलंगणात चंद्रशेखर राव सत्ता कायम राखणार असल्याचं दिसत आहे. तेलंगणात काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाला अपशय आल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

राजस्थानात वसुंधरा राजेंना धक्का

राजस्थान विधानसभेत 200 जागा असून बहुमताचा आकडा 101 आहे. मात्र 199 जागांवर निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस 101 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात 83 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 15 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात भाजपची हार, काँग्रेस सत्ता मिळवण्याचा अंदाज

मध्य प्रदेश विधानसभेत 230 जागा असून बहुमताचा आकडा 116 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात काँग्रेस 122 ते 130 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात केवळ 91 ते 97 मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच काँग्रेसला सरासरी 126, तर भाजपला 94 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. 10 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

रमण सिंह चौथ्यांदा छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची चिन्हं

छत्तीसगड विधानसभेत 90 जागा असून बहुमताचा आकडा 46 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 48 ते 56 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. काँग्रेसच्या पारड्यात 32 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच भाजपला सरासरी 52, तर काँग्रेसला सरासरी 35 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर 3 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.