नवी दिल्ली : गांधी जयंतीदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी रेल्वेमध्ये नॉनव्हेज पदार्थ खाण्यास देऊ नये, अशी शिफारस रेल्वे मंत्रालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. जर केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाची शिफारस मानली, तर गांधी जयंतीदिनी स्वच्छता दिनासोबतच ‘व्हेजेटरियन डे’ही साजरा केला जाईल.
महात्मा गांधीजींची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी केंद्राने तयारी केली आहे. याच तयारीच्या अनुशंघाने 2018 ते 2020 या काळात 2 ऑक्टोबरला रेल्वेमध्ये नॉनव्हेज पदार्थ देऊ नयेत, अशी शिफारस करण्यात आली आहे.
महात्मा गांधीजींची 150 वी जयंती विशेष ठरावी, उत्तमपणे साजरी व्हावी म्हणून केंद्र सरकारने विशेष समिती गठीत केली आहे.
महात्मा गांधीजींशी संबंधित देशातील महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत रेल्वे चालवण्याची योजनाही रेल्वे मंत्रालयाची आहे. साबरमतीहून एक विशेष ‘स्पेशल सॉल्ट रेक’ही चालवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
एकंदरीतच, महात्मा गांधीजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.