मुंबई: राजस्थानमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यामध्ये एक पत्नी तिच्या पतीला मारहाण करताना दिसतेय. पण असा मार खाणारा तो पहिला पती नाही, देशामध्ये प्रत्येक दहापैकी एका पतीला त्याची पत्नी मारहाण करते असं अभ्यासातून समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मार खाणाऱ्या पतींची संख्या ही ग्रामीण भागात जास्त असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल फॅमेली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) च्या आकडेवारीतून ही गोष्ट समोर आली आहे.
नॅशनल फॅमेली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) च्या आकडेवारीनुसार, 18 ते 49 वयोगटातील 10 टक्के महिलांनी कधी ना कधी त्यांच्या पतीवर हात उचलला आहे. पतीने त्यांच्यासोबत हिंसा करण्याचा प्रयत्न केल्यानंतरल त्यांनी हे कृत्य केल्याचं कबुल केलं आहे.
या सर्व्हेच्या दरम्यान, 11 टक्के महिला अशा आहेत की ज्यांनी गेल्या वर्षभरात त्यांच्या पतीला अनेकदा मारहाण केली आहे. महिलांचं वय वाढेत तसतसं महिलांकडून पतीला मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. 18 ते 19 वयोगटातील 1 टक्क्क्याहून कमी महिलांनी त्यांच्या पतीला मारहाण केली आहे. 20 ते 24 वयोगटातील 3 टक्के महिलांनी त्यांच्या पतीला मारहाण केली आहे. 25 ते 29 वयोगटातील 3.4 टक्के महिलांनी त्यांच्या पतीला मारहाण केली आहे. 30 ते 39 वयोगटातील 3.9 टक्के तर 40 ते 49 वयोगटातील 3.7 टक्के महिलांनी त्यांच्या पतीला मारहाण केल्याचं आकडेवारी सांगतेय.
ग्रामीण भागातील पतींनी जास्त मार खाल्ला
या सर्व्हेतील आकडेवारी सांगतेय की, शहरापेक्षा ग्रामीण भागामधील पतींनी त्यांच्या पत्नीकडून अधिकचा मार खाल्ला आहे. शहरी भागातील 3.3 टक्के पत्नींनी त्यांच्या पतींना मारहाण केली तर ग्रामीण भागातील 3.7 टक्के पत्नींनी त्यांच्या पतींना मारहाण केल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतंय.
राजस्थानमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. त्यामध्ये एक पत्नी तिच्या पतीला हाताला लागेल त्या वस्तूने मारहाण करताना दिसतेय. या व्हिडीओमधील मार खाणारा व्यक्ती हा एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. अजित सिंह असं त्या व्यक्तीचं नाव असून त्याची पत्नी त्याला पळवून-पळवून मारताना दिसते.