Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया होत असतात. येथेच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत, जी हा देश धोकादायक असल्याचे सिद्ध करतात. पाकिस्तानकडे अशी शस्त्रे देखील आहेत, जी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकतात. भारताकडेही अण्वस्त्रे आहेत, पण भारताचे धोरण हे आहे की, ते आधी अण्वस्त्रे डागणार नाहीत. पण पाकिस्तानमध्ये असे कोणतेही धोरण किंवा नियम बनवण्यात आले नाही. 


अलीकडेच न्यूज एजन्सी रॉयटर्सने स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानकडे 100 ते 120 अण्वस्त्रे आहेत. जे लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांद्वारे डागता येऊ शकतात. त्याचबरोबर भारताकडे 90 ते 110 अण्वस्त्रे आहेत. पण फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) नुसार, पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 160 अण्वस्त्रे आहेत. आता नेमकी आकडेवारी काय आहे हे सांगणे कठीण आहे.


जगभरात 12,700 अण्वस्त्रे आहेत


फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) च्या मते, जगात 12,700 अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी 9400 सैन्याकडे आहेत, ज्यांचा वापर क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, युद्धनौका किंवा पाणबुड्यांमधून केला जाऊ शकतो. बाकीची अण्वस्त्रे निष्क्रिय झाली आहेत, पण ती सुरक्षित असून अद्याप त्यांना नष्ट करण्यात आलं नाही. जगात 9440 अण्वस्त्रे आहेत, जी वेगवेगळ्या देशांच्या सैन्याकडे आहेत. त्यापैकी 3730 मिसाईल आणि बॉम्बर्समध्ये तैनात आहेत. यापैकी भारत आणि पाकिस्तानने त्यांची कोणतीही अण्वस्त्रे तैनात केलेली नाहीत. 3730 अण्वस्त्रांपैकी सुमारे 2000 अण्वस्त्रे अमेरिका, रशिया, ब्रिटिश आणि फ्रान्समध्ये हाय अलर्टवर आहेत. म्हणजेच शॉर्ट नोटीसवर हे अल्प अण्वस्त्रे डागले जाऊ शकतात.


पाक क्षेपणास्त्रांच्या रडारवर अर्ध्याहून अधिक भारतीय क्षेत्र 


पाकिस्तानकडे नस्त्र, हत्फ, गझनवी आणि अब्दाली ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यांची रेंज 60 ते 320 किमी आहे, तर मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची, गौरी आणि शाहीनची रेंज 900 ते 2700 किमी आहे. या दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला तर दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, भोपाळ, नागपूर, लखनौचे मोठे नुकसान होऊ शकते. 


भारतीय क्षेपणास्त्रांच्या रडारवर संपूर्ण पाकिस्तान 


भारताकडे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र पृथ्वी आहे. त्याची रेंज 350 किमी आहे. अग्नी-1 ची रेंज 700 किमी, अग्नी-2 2000 किमी आणि अग्नि-3 ची रेंज 3000 किमी आहे. या सर्वांना लष्करात सामील करण्यात आलं आहे. अग्नी-V ची रेंज 5000 किमी आहे. म्हणजेच या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारत पाकिस्तानातील सर्व शहरांना लक्ष्य करू शकतो. भारताने पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकल्यास रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, नवशेरा आणि कराची शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात.


भारत आणि पाकिस्तानचे आण्विक धोरण


भारताने 1999 मध्ये 'प्रथम वापर नाही' असे आण्विक धोरण जाहीर केले. म्हणजेच भारत प्रथम कधीही अण्वस्त्रे वापरणार नाही. अण्वस्त्र हल्ला झाल्यासच भारत अणुबॉम्बचा अवलंब करेल. त्याचबरोबर पाकिस्तानात असा कोणताही नियम किंवा कायदा नाही. अणुहल्ला कधी आणि कोणत्या परिस्थितीत करायचा हे पाकिस्तानच्या नेत्यांनी आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे.