लखनौ : उत्तर प्रदेशच्या अलिगड विद्यापीठातील प्राध्यापकानं व्हॉट्सअॅपवरुन तिहेरी तलाक दिल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. प्राध्यापकाच्या पत्नीनं यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मात्र पती तिहेरी तलाक देण्यावर ठाम आहे.


प्राध्यापक खालिद बिन युसुफ खान यांनी अद्याप तिहेरी तलाक झाला नसल्याचं सांगितलं आहे. 'मी तिला तोंडी तलाक दिला आणि त्याबाबत पोस्ट-व्हॉट्सअॅपने पाठवलं. महिन्याभरानंतर मी तिला पुन्हा तोंडी तलाक दिला आणि एसएमएसने कळवलं. मी तिला तिसऱ्यांदा घटस्फोट दिलेला नाही. त्यामुळे ती अजूनही माझी पत्नी आहे' असा दावा खालिद यांनी केला.

प्राध्यापक खालिद बिन युसुफ खान हे अलिगड मुस्लिम विद्यापीठात संस्कृत विभागाचे प्रमुख आहेत.

पतीने आपल्याला घराबाहेर काढलं, मात्र पोलिसांच्या मदतीने आपण शुक्रवारी घरात शिरकाव केला, असं पत्नी यास्मिन खालिद यांनी सांगितलं. आपल्याला न्याय न मिळाल्यास मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. खालिद यांच्या लग्नाला 27 वर्ष झाली आहेत.

'माझी पत्नीच मला गेल्या 20 वर्षांपासून त्रास देत आहे. आमच्या लग्नाआधीपासून तिने काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. तिने केलेल्या दाव्याप्रमाणे ती पदवीधरही नाही. मी ठरलेल्या दिवशी तिला तिसरा तलाक देणारच. मला कोणीही थांबवू शकत नाही. ती काय करेल, याची मला पर्वा नाही'

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर बंदी घातली आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपपवरुन तलाक दिल्याचं  प्रकरण उजेडात आल्यानं या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे.