Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय मंगळवारी दुपारी 2 वाजता निकाल सुनावणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला असून आज निकाल सुनावणार आहे. 


आज निकाल सुनावणार 
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर झाली. ज्ञानवापी मशीद प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रक्रिया काय असावी याबाबत कोर्ट आज निकाल सुनावणार आहे. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत. त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेसुद्धा मंगळवारीच म्हणजे आज सांगण्यात येणार आहे. तसंच याबाबतच्या अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. 


न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठण्यात आले.


ज्ञानवापी मशीद प्रकरणावर काय आहेत मागण्या


हिंदू पक्षाने काय म्हटलं?


1. शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी
2. वाजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी
3. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी
4. शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी
5. वाळूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी



मुस्लिम पक्षाची बाजू


1. वजूखाना सील करण्यास विरोध


2.  1991 कायद्यांतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि  खटल्यावर प्रश्नचिन्ह 


 


काल वाराणसी जिल्हा कोर्टातील सुनावणीत खटल्याशी संबंधितांना प्रवेश देण्यात आला. हिंदू पक्षाच्यावतीने ज्येष्ठ अधिवक्ता मदन बहादूर सिंह उपस्थित होते. त्यांच्यासोबत अॅड. हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन आदी उपस्थित होते. तर, मुस्लिम पक्षाच्यावतीने रईस अहमद आणि सी. अभय यादव उपस्थित होते. मुस्लिम पक्षाच्यावतीने अभय नाथ यादव यांनी दीन मोहम्मद यादव यांच्या 1936 च्या खटल्याचा संदर्भ दिला. यामध्ये ज्ञानवापी मशिदीत दीर्घकाळापासून नमाज अदा केली जात आहे.  त्या ठिकाणी मशीद असून उच्च न्यायालयाने देखील मुस्लिम पक्षाच्या बाजूने निकाल दिला होता, हा मुद्दा मांडला. दरम्यान, वाराणसी जिल्हा न्यायलयाने या वादाच्या सुनावणीची प्रक्रिया काय असावी याबाबत कोर्ट निकाल आज सुनावणी करणार आहे. पुढील सुनावणी सीपीसीच्या नियम 11 पर्यंत सुनावणी घ्यावी की कमिशन अहवाल आणि सीपीसीनुसार सुनावणी घ्यावी यावर निकाल सुनावणार आहे.