नवी दिल्ली : मजुरांसाठी बसेस पाठवण्यावरुन काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशातलं भाजप सरकार यांच्यात जोरदार घमासान सुरु आहे. यूपीतल्या मजुरांसाठी 1 हजार बसेस पाठवायला परवानगी द्या अशी विनंती प्रियंका गांधी यांनी 16 मे रोजी केली होती. काल अखेर यूपी सरकारनं त्यांना आपण परवानगी देत असल्याचं एका पत्राद्वारे दर्शवलं खरं, पण वेगवेगळे नियम काढून हैराण करण्याचं कामही दुसऱ्या बाजूला चालू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप सुरू आहे.
काँग्रेसच्या वतीनं आग्र्याजवळच्या राजस्थान बॉर्डरवर बसेस तयार असल्याचा दावा केला जात आहे. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी यूपी सरकारच्या विरोधात निदर्शनंही केली. बसेस पाठवायला काल परवानगी दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांत यूपी सरकार आणि प्रियंका गांधींचे सचिव संदीप सिंह यांच्यात तब्बल 9 वेळा पत्रव्यवहार झाला आहे. परवानगी दिल्यानंतर या बसेस लखनौमध्ये घेऊन या असाही आदेश यूपी सरकारच्या सचिवांनी दिला होता. शिवाय ज्या 1 हजार बस चालकांची यादी काँग्रेसच्या वतीनं सादर करण्यात आली, त्यातही काही त्रुटी असल्याचा दावा यूपी सरकारच्या वतीनं केला जातोय. तर हा सगळा प्रकार म्हणजे मजुरांच्याप्रती यूपी सरकार किती असंवेदनशील आहे याचाच नमुना असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केला आहे.
उत्तर प्रदेश सरकार ड्रायव्हरना धमकावत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. काल गाझियाबादमध्ये बसेसच्या रजिस्ट्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. त्यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर काल दुपारी यूपी सरकारनं प्रियंका गांधींची ही विनंती मान्य केली होती. पण एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत या बसेस मात्र अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
संबंधित बातम्या :
- केंद्र सरकारचा यू टर्न, लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचा आदेश मागे
- Lockdown 4.0 | देशात कुठे आणि कसा उठणार लॉकडाऊन?
- अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून यूजीसीला परवानगीसाठी पत्र
India Corona Update देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कशी वाढत गेली?महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती काय?