तलवार दाम्पत्याची आज सुटका, मात्र दर 15 दिवसांनी जेलवारी
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2017 08:06 AM (IST)
तलवार दाम्पत्याने कारागृहातील दाताचा दवाखाना सांभाळला होता. आता त्यांची कारागृहातून सुटका होणार असल्यामुळे त्यांच्यानंतर जेलमधील दाताचा दवाखाना कोण चालवणार, हा प्रश्न कारागृह प्रशासनापुढे होता.
नवी दिल्ली : आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांडाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले आरुषीचे आई-वडील म्हणजेच नुपूर आणि राजेश तलवार यांची आज सुटका होणार आहे. मात्र तलवार दाम्पत्य 15 दिवसातून एकदा कारागृहाला भेट देणार आहे. दंतचिकित्सक असणारे तलावर दाम्पत्य 2013 मध्ये गाझियाबादच्या दासना कारागृहात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी कारागृहातील दाताचा दवाखाना सांभाळला होता. आता त्यांची कारागृहातून सुटका होणार असल्यामुळे त्यांच्यानंतर जेलमधील दाताचा दवाखाना कोण चालवणार, हा प्रश्न कारागृह प्रशासनापुढे होता. प्रशासनाने तलवार दाम्पत्याला दर 15 दिवसांनी कारागृहातील कैद्यांना तपासायला येण्याची विनंती केली होती. तलावार दापत्याने त्यांची ही विनंती मान्य केली आहे, असं कारागृहाचे डॉक्टर सुनिल त्यागी यांनी संगितलं. त्यामुळे तलावार दाम्पत्याला दर 15 दिवसांनंतर कारागृहात यावं लागणार आहे.