या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2017) विकास दर घसरण्यामागे नोटाबंदी कारणीभूत नाही, असंही राजीव कुमार म्हणाले. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जीडीपी 5.7 टक्के दाखवण्यात आला आहे, जो गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी आहे.
पदभार सांभाळल्यानंतर राजीव कुमार यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विकास दर घसरण्यामागे नोटाबंदी कारणीभूत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र विकास दर घसरण्याला नोटाबंदी कारणीभूत नाही, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
नोटाबंदी केवळ 6 महिन्यांसाठी म्हणजे 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळत होती. त्यातही चलन उलब्ध होतं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नव्या नोटा चलनात आणण्याचं काम सुरु करण्यात आलं. केवळ 6 आठवडे चलन तुटवडा जाणवला. म्हणून नोटाबंदीमुळे विकास दर घटला, असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं राजीव कुमार म्हणाले.
उत्पादन क्षेत्रात घट झाल्यामुळ विकास दर घटला. जीएसटीच्या काळात कंपन्यांनी अगोदर तयार केलेला माल भरघोस सूट देऊन विकला आणि त्या काळात उत्पादनात घट झाली, असंही राजीव कुमार म्हणाले. उत्पादन क्षेत्राचा दर या तिमाहीत 1.2 टक्के आहे, जो एका वर्षापूर्वी 10.7 टक्के होता.