Delhi Yamuna Flood : देशाची राजधानी दिल्लीत पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. तब्बल 45 वर्षांनंतर येथील नदीच्या पाणी पातळीने 208 मीटरचा टप्पा ओलांडला आहे. पूरस्थिती पाहता दिल्ली सरकार सतर्क आहे. 


केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) फ्लड-मॉनिटरिंग पोर्टलनुसार, जुन्या रेल्वे पुलावरील पाण्याची पातळीने 2013 नंतर प्रथमच बुधवारी (12 जुलै) रोजी पहाटे 4 वाजता 207 मीटरचा टप्पा ओलांडला. दुपारी 4 वाजेपर्यंत त्यात 207.71 मीटर इतकी विक्रमी वाढ झाली. रात्री 11 वाजता ते 208.08 मीटरपर्यंत वाढले आणि आज (13 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत हे पाणी 208.30 मीटरपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.


दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, यमुनेची जलपातळी 11 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय जल आयोगाने 13 जुलै रोजी पहाटे 4 ते सकाळी 6 या कालावधीत केलेल्या 207.99 मीटरच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.


जुन्या रेल्वे पुलावरील पाण्याची पातळी वाढली


जुन्या रेल्वे पुलावर रात्री 10 वाजता वाढ नोंदविण्यात आल्याचे सरकारने सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, यापूर्वी 1978 मध्ये दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी 207.49 मीटरपर्यंत पोहोचल्याची नोंद होती. बुधवारी रात्री 9 वाजता जुन्या रेल्वे पुलावर यमुनेच्या पाण्याची पातळी 207.95 मीटर नोंदविण्यात आली. याआधी रात्री 8 वाजता हातिनीकुंड बॅरेजमधून 1,47,857 क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या अनेक भागांत पुराचे पाणी शिरले आहे. 


बचाव कार्यासाठी 45 बोटी तैनात


दिल्लीतील पूरपरिस्थिती पाहता बोट क्लबच्या 17 बोटी आणि पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या 28 बोटी जनजागृती, बाहेर काढणे आणि बचाव कार्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. एकूण 45 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तर, सर्वाधिक पूरग्रस्त भागात बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


एमसीडीने सखल भागातील अनेक शाळांना सुट्टी दिली 


दिल्ली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सखल भागातील काही शाळांनी आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने घेतला जाईल. 


एमसीडीच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “दिल्लीतील पूरसदृश परिस्थिती लक्षात घेता, एमसीडीच्या शिक्षण विभागाने सिव्हिल लाईन्स झोनमधील सखल भागातील 10 शाळा, शाहदरा दक्षिण विभागातील 6 शाळा आणि एक शाळा येथे स्थलांतरित केली आहे. शाहदरा उत्तर विभाग आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.


संवेदनशील भागात कलम 144 लागू


दिल्लीतील यमुना नदीच्या परिसरात बांधलेल्या घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पूरसदृश परिस्थिती लक्षात घेता, दिल्ली पोलिसांनी बुधवारी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय राजधानीतील पूरप्रवण भागात कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. या कलमांतर्गत एकाच ठिकाणी चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.


मुख्यमंत्री केजरीवाल यांचं गृहमंत्री अमित शहांना पत्र


दिल्ली पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढू नये यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी विनंती केली आहे की, "शक्य असल्यास हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून मर्यादित प्रमाणात पाणी सोडा." आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायचे आहे. या शब्दांत पत्र लिहिले आहे. 


मुख्यमंत्री केजरीवाल यांचं जनतेला आवाहन


यमुनेच्या पाण्याची वाढती पातळी पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सखल भागात राहणाऱ्या लोकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. “मी सखल भागांत राहणाऱ्या सर्व लोकांना बाहेर पडण्याचे आवाहन करतो कारण पाण्याची पातळी अचानक वाढेल आणि तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी 


प्राधिकरणाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये यमुना नदीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे लोकांनी विद्युत तारांपासून दूर राहावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक 1077 वर संपर्क साधावा, असे म्हटले आहे. 


जुना रेल्वे पूल बंद


सोमवारी रात्री यमुनेच्या पाण्याच्या पातळीने 206 मीटरचा टप्पा ओलांडला, ज्यामुळे पूरग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आणि जुना रेल्वे पूल रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दिल्लीचे जलमंत्री सौरभ भारद्वाज यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दिल्ली सरकार परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. "आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सर्व शक्य पावले उचलली जात आहेत," असे ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या : 


India Rain Update: पुरामुळं उत्तर भारतात गंभीर स्थिती, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; उत्तराखंडला 413 कोटींची मदत