Delhi Wrestlers Protest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (Arvind Kejriwal) महिला कुस्तीपटूंवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंची भेट घेतली. यावेळी सीएम केजरीवाल यांनी भारत माता की जय आणि इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा देत कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. आमच्या बहिणींसोबत गैरवर्तन करणाऱ्याला तत्काळ शिक्षा करून फाशी द्यावी, असे ते म्हणाले. सीएम केजरीवाल पुढे म्हणाले की, आपल्या देशातील कोणत्याही मुलीसोबत गैरवर्तन झाले असेल तर त्याला तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण दुःख या गोष्टीचे आहे की, ज्या मुलींनी भारताचे नाव उंचावले त्याच मुलींना ज्याने चूक केली आहे त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी जंतर मंतरवर बसावं लागतं? अशी काय अडचण आहे?


'गरीबांच्या मुलांना शिकवणाऱ्याला मोदींनी तुरुंगात टाकले'


केजरीवाल यांनी ट्वीटही केले. ते म्हणाले की, मोदीजींनी गरीबांच्या मुलांना शिकवणाऱ्याला तुरुंगात टाकले आणि महिला खेळाडूंचे शोषण करणाऱ्याला मिठी मारली? दुसर्‍या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "भारत मातेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनेपाठिंबा देण्यासाठी यावे, जरी दोन दिवस सुट्टी घ्यावी लागली तरी. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत आणि अनेक दिवसांपासून या प्रकरणाला विरोध करत आहेत.


'संपूर्ण देश या खेळाडूंच्या पाठीशी उभा आहे'


मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पाहणारा प्रत्येक युवक त्यांच्या पाठीशी उभा आहे. संपूर्ण देश या खेळाडूंच्या पाठीशी उभा आहे. ते एकटे नाहीत. जेव्हापासून या मुली एफआयआर नोंदवण्यासाठी धडपडत आहेत, तेव्हापासून मोदी अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत, असा प्रश्न माझ्या मनात येत आहे. त्यांच्या एका माणसाने शेतकऱ्यांवर वाहन चालवले होते, त्यावरही ते कारवाई करत नाहीत. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या माणसाने काहीही केले, जरी त्याने आपल्या मुलींशी गैरवर्तन केले, तरीही त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या