Mukhtar Ansari Convicted: उत्तर प्रदेशातील गाजीपूरच्या MP-MLA कोर्टाने गँगस्टर मुख्तार अन्सारीला सोळा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. सोबतच मुख्तारला पाच लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. मुख्तार अंसारीला ज्या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली ते प्रकरण भाजपचे माजी आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात बसपाचे विद्यमान खासदार आणि मुख्तार अन्सारी याच्या भावावरही गुन्हा दाखल आहे. मात्र न्यायालयाने त्याच्याबाबतचा निकाल अजून राखून ठेवला आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत राय यांच्या पत्नीने कोर्टात सांगितले होते की, 'उत्तर प्रदेशात आता गुंड माफीयांची राजवट संपली आहे आणि तिचा न्यायवेवस्थेवर देखील विश्वास आहे.' तसेच अन्सारीला बांदा येथील उच्च श्रेणीच्या तुरुंगात ठेवण्याची परवानगी देण्याचा 18 जानेवारीला गाझीपूरच्या MP-MLA न्यायालयाने आदेश दिला होता. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाने 15 मार्चला हा आदेश फेटाळून लावला.
नक्की काय आहे प्रकरण..
मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध हे गुन्हे भाजपचे दिवंगत आमदार कृष्णानंद राय आणि नंदकिशोर गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. मुख्तार आणि अफजाज अन्सारी यांच्याविरुद्ध मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात २००७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्तार अन्सारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बांदा कारागृहाशी संबंधित होता. 2005 मध्ये कृष्णानंद राय यांची मुहम्मदाबादमधील बसनिया चट्टीजवळ हत्या करण्यात आली होती.
21 सप्टेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने अन्सारीला दोषी ठरवले. तुरुंग अधीक्षक एसके अवस्थीला धमकावल्याबद्दल आणि त्यांच्याकडे पिस्तूल दाखवल्याबद्दल अन्सारीला शिक्षा सुनावण्यात आली होती. हा खटला 2003 चा आहे जेव्हा लखनौ जिल्हा कारागृहातील तुरुंगाधिकारी एसके अवस्थी यांनी तक्रार दाखल केली होती. 23 सप्टेंबर रोजी लखनौ खंडपीठाने अन्सारीला गँगस्टर कायद्यांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा सुनावली. वीस वर्षे जुन्या या प्रकरणात न्यायालयाने मुख्तारला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता.
कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची हत्या करण्यात आली होती. मुख्तार अन्सारी सध्या यूपीच्या बांदा तुरुंगात आहे. मात्र, 15 एप्रिल रोजीच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मात्र शनिवारी न्यायालयाने हा निकाल दिला. निकाल सुनावण्यापूर्वी गाझीपूर येथील न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मुख्तार अन्सारी हा मऊ विधानसभा मतदारसंघातून अनेकदा आमदार राहिला देखील आहेत.