Delhi Rain News : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळी पावसाची (Unseasonal rains) हजेरी लागत आहे. दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्वीच दिल्लीत 200 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, 7 मे पर्यंत दिल्लीत आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मान्सूनपूर्व कालावधीत (1 मार्च ते 31 मे) दिल्लीमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा 200 टक्के जास्त पाऊस झाला असल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग हवामान केंद्रानं दिली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत या वेळी 221 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मान्सूनपूर्व काळात येथे साधारणपणे 48 मिमी पावसाची नोंद होते.
दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण
दिल्लीत गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मे हा दिल्लीचा सर्वात उष्ण महिना आहे. या महिन्यात दिल्लीत सरासरी कमाल तापमान 39.5 डिग्री सेल्सियस आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 8 मे पर्यंत दिल्लीत कमाल तापमान 35 अंशांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. राजधानीत 7 मेपर्यंत आकाश ढगाळ राहील आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात अवकाळीचा कहर
देशातील अनेक राज्यात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी उन्हाचा कडाका पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर घातला आहे. कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर कुठे गारपीट झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तर नंदुरबारमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अन्य जिल्ह्यातही द्राक्ष, आंबा, संत्रा, रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील नाशिक, नंदुरबार, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. आधीच सातत्यानं बदलत जाणाऱ्या हवामानाचा फटका शेती पिकांना बसत असताना त्यात पुन्हा अवकाळी पावसानं भर घातल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात आहेत.