Brij Bhushan Sharan Singh News: महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचा आरोप केलेले भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे समाजवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. महिला पैलवानांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांची कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. जर या प्रकरणात भाजपने बृजभूषण सिंह यांच्यावर काही कारवाई केल्यास त्यांना समाजवादी पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


कुस्तीसंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्लीत पैलवानांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भारतीय जनता पक्षाने मौन पाळले आहे. ब्रृजभूषण शरण सिंह आपल्या बचावात काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास ते समाजवादी पक्षासोबत जाऊ शकतात.


या संपूर्ण प्रकरणात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अद्याप पैलवानांच्या बाजूने कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. तसेच कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर कारवाई करावी अशी मागणीही केली नाही. यापूर्वी ब्रृजभूषण सिंह यांनीही या कारणावरून अखिलेश यांचे कौतुक केले आहे. यावरून ते सपामध्ये सामील होऊ शकतात याचा अंदाज बांधला जातो.


ब्रृजभूषण सिंह म्हणाले, अखिलेश यादव यांना सत्य माहित आहे. मला राजकारणाचा बळी बनवला जात आहे. माझ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांचे राजकीय लागेबांध उघड आहेत.  


समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनाही ब्रिजभूषण यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात टीव्ही वाहिण्यावर भाष्य करू नका, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती आहे.


पूर्व उत्तर प्रदेशातील आपले वर्चस्व कमी होऊ नये, विशेषत: ज्या ठिकाणी ब्रृजभूषण सिंहांचे प्राबल्य जास्त आहे, त्या ठिकाणी पक्षाला या प्रकरणी कोणताही फटका बसू नये यासाठी भाजप टाळाटाळ करत असल्याचे सूत्रांकडून समजते. पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त काही महिने उरले आहेत. सुमारे 6 ते 7 जागांवर ब्रृजभूषण सिंह यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे भाजप या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. 


जर ब्रृजभूषण सिंह समाजवादी पक्षात जाण्याचा विचार करत असतील तर सपा त्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यास तयार असल्याची माहिती आहे..


सपाकडे ठाकूर असा तगडा नेता नाही


वास्तविक पाहता अखिलेश यादव यांचे राजा भैय्या यांच्याशी असलेल्या वाईट संबंधांमुळे समाजवादी पक्षाकडे असा एकही ठाकूर नेता नाही, ज्याचा थेट जनतेवर प्रभाव पडेल आणि जो ठाकूरांची मते सपाकडे खेचू शकेल. एकेकाळी यूपीएच्या बाजूने मतदान केल्यामुळे ब्रृजभूषण सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी 2008 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला. 2013 मध्ये ते पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले.


ब्रृजभूषण सिंह यांचा समाजवादी पक्षात पुनरागमनाचा मार्गही सोपा असल्याचं सांगितलं जातं. कारण पक्षात त्यांचे सर्वात मोठे विरोधक असलेले विनोद सिंग उर्फ ​​पंडित सिंग यांचं निधन झालं आहे, तसेच बाबरी प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.