दिल्ली: महाकुंभसाठी निघालेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा बळी (Delhi stampede) गेला आहे. त्याचबरोबर अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही घटटना घडल्याचं सांगत विरोधी पक्षांनी टीका केली आहे. चेंगराचेंगरी (Delhi stampede) का झाली, याचा तपास सुरू असून प्लॅटफॉर्म बदलताना चेंगराचेंगरी होऊन गुदमरून प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर काही बेपत्ता असलेल्यांचा शोध घेणं अद्याप सुरूच आहे, अशातच बेपत्ता असलेल्या आपल्या पत्नीसाठी एक व्यक्ती वणवण फिरतो आहे.
तुम्ही पाहिलं का हो हिला?
गुप्तेश्वर यादव आपल्या हातात फोन घेऊन त्यावर त्यांच्या पत्नी तारादेवी (50) यांचा फोटो दाखवत सर्वत्र शोध घेत आहेत. निळ्या साडीत, कपाळावर ठसठशीत कुंकू. हातात बांगड्या असा फोटो मोबाईलमधून दाखवत प्रत्येकाला विचारत असतात, तुम्ही पाहिलं का हो हिला? नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. 14 वर 'गर्दीत काल रात्री मी तिला शेवटचं पाहिलं होतं' ही 52वर्षाची व्यक्ती धीर एकवटून संगत असते, मी तिची वाट पहात होतो, पण ती आलीच नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत सांगताना गुप्तेश्वर म्हणतात, त्यावेळी मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर होती, स्वतःचं स्वतः चालणंच कठीण झालं होतं. मला ढकललं जात होतं. गर्दी वाढतच होती, ते पाहून मी माघारी फिरलो. पत्नीला शोधू लागलो. काही फुटांवरचं पण दिसत नव्हतं. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. ढकलाढकली होत होती, पण, जागेवरून हलायलाही जागा नव्हती. हवा येत नव्हती, जीव गुदमरत होता, ज्याला पकडावं अशी वस्तूही नव्हती. एका कडेकडेने मी फलाटाकडे ढकलला जात होतो, त्यावेळी मनात एकच विचार होता, माझी तारा कुठे आहे?
ते आणि त्यांचे बंधू चित्तेश्वर अख्खी रात्र हॉस्पिटलमध्ये रांगेत ठेवलेले मृतदेह तपासत होते. त्यात कुठेच ती नव्हती. मग मनात एक जाणीव वाटली, तारा जीवंत असेल. दोघे भाऊ जीवाचा आटापीटा करून तारा यांचा शोध घेत होते. पुढे ते सांगतात, घटना घडल्यानंतर फ्लॅटफॉर्म आणि ओव्हरब्रिज रिकामे केले गेले. आम्ही सकाळी ताकद एकवटून उठलो, सात वाजता पुन्हा स्थानकावर आलो. ताराचा शोध सुरू केला. पण अजून तरी ती सापडली नाही. अनेक लोक यामध्ये गेले, काही जखमी झाले. या घटनेने दिल्ली हादरलं.
हरवलेल्यांचा शोध सुरूच
रविवारी सकाळी फलाट स्वच्छ करण्यात आला. दुर्घटना घडली त्या ठिकाणी दोर बांधण्यात आले. जागोजागी रक्षक उभारले. प्रवासीही सावध वागू लागले. तरीही अनेक जण हरवलेल्यांना शोधत होते.