नवी दिल्ली दिल्लीतील आणि विशेषत: पत्रकारांसाठी आजचा दिवस धक्कादायक घडामोडींनी उजाडला. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक (Delhi Police) आज भल्या पहाटे पत्रकारांच्या घरी धाडीसाठी पोहचलं. 30 ठिकाणी 100 पोलिसांची टीम जवळपास 8 ते 9 पत्रकारांच्या वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत पोहचलं. अभिसार शर्मा (Abhisar Sharma), प्रबीर पूरकायस्थ (Prabir Purkayastha), भाषा सिंह (Bhasha Singh), उर्मिलेश (Urmilesh), सोहेल हाश्मी (Sohail Hashmi)  हे पत्रकार आणि माध्यमांशी संबंधित असलेल्या व्यक्ती 'न्यूजक्लिक' या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित आहेत. चीनकडून होणाऱ्या फंडिगबाबत आणि त्यातून काही देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. आज पहाटे सहा वाजल्यापासूनच या कारवाईला सुरुवात झाली.


>> न्यूज क्लिकवर धाडींचं कारण काय?


- 5 ऑगस्ट 2023 रोजी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली. 
- नेविली रॉय सिंघम हा अमेरिकन व्यक्ती चीनसाठी काम करत देशभरातल्या संस्थांना चायनीज फंड पुरवून त्यांचा अजेंडा चालवत असल्याचा दावा 
-  भारतात न्यूजक्लिकला नेविली रॉय सिंघमने फंड पुरवल्याचा आरोप होता
- याआधी 2021 मध्येही न्यूजक्लिकच्या कार्यालवर आयकर खात्यानं अवैध फंडिगबाबत धाडी टाकल्याच होत्या
- न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनंतर पुन्हा एक नवी केस दाखल करण्यात आलीय 


या प्रकरणात दुपारपर्यंत अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. दिल्ली पोलिसांनी मध्यरात्रीच यासाठी एक विशेष मीटिंग घेऊन कारवाई केल्याचं म्हटलं जातंय. 'न्यूजक्लिक' विरोधात  दहशतवादविरोधी यूएपीए कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे. 


पत्रकारांचे फोन, लॅपटॉपही जप्त केले गेलेत. दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्याआधी या प्रकरणात आरोपींची ए, बी, सी अशी वर्गवारीही केली. काहींना लोधी रोड पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावलं गेलं, तर काहींची घरातच चौकशी करण्यात आली आहे. ज्या 25 प्रश्नांची यादी चौकशीसाठी तयार केली गेली. त्यात शेतकरी आंदोलन, शाहीनबाग आंदोलन, ईशान्येतल्या आंदोलनाबाबतचेही प्रश्न असल्याची सूत्रांची माहिती आहे. देशातल्या अनेक पत्रकार संघटनांनी या कारवाईचा निषेध केला आहे.  


'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी  लोकसभेत काँग्रेस, चीन आणि काही पत्रकार हे त्रिकूट मिळून देशविरोधी कारवाया असल्याचा आरोप केला होता. '


>> 'न्यूजक्लिक'ला तीन वर्षात 38 कोटींचा निधी 


न्यूजक्लिकविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. एखाद्या वृत्तसंस्थेविरोधात दहशतवादी कारवायांच्या नावाखाली गुन्हा दाखल होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. अतिरेकी कारवायांसाठी निधी उभारणे, गुन्हेगारी कट आणि कंपनी कराराचं उल्लंघन या कलमांतर्गत हे गुन्हे आहेत. 38 कोटी रुपयांचे ट्रान्सझॅक्शन 2018 ते 21 या अवघ्या तीन वर्षांच्या काळात झाल्याची चौकशी यंत्रणांची माहिती आहे. जो फंड मिळाले त्यातलाच काही फंड गौतम नवलाखा, तीस्ता सेटलवाड यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही वळवण्यात आला. नवलाखा यांचं नाव भीमा कोरेगाव प्रकरणात आधीपासूनच होतं. तर तीस्ता सेटलवाड यांच्यावरही कोर्ट केसेस आहेत.


>> वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबत देशाची स्थिती चिंताजनक


वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत देशाची स्थिती गेल्या काही वर्षात खालावत चालली आहे. 180 देशांच्या यादीत भारताचं स्थान 161 वर पोहचलं आहे.. म्हणजे तळाच्या 20 देशांमध्ये भारताचे स्थान आहे. आता या केसमध्ये खरोखर दहशतवादाशी संबंध कोर्टात स्थापन होते का आणि पुढे काय निष्पन्न होतं हे पाहावं लागणार आहे.