China Funding Row: दिल्लीत (Delhi) अनेक पत्रकार (Journalist) आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकानं छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. पत्रकार अभिसार शर्मा (Journalist Abhisar Sharma) यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. तसेच, संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या घरीही पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित आहेत. यातल्या काही पत्रकारांना पोलीस स्टेशनलाही नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिनी फंडिंग संदर्भात आरोप न्यूज लिंकवर करण्यात आले होते. त्यानंतर ईडीनं एक केसही दाखल केली होती.


दिल्ली पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी न्यूज पोर्टलशी संबंधित पत्रकार अभिसार शर्मा आणि भाषा सिंह यांच्या घरांवर छापे टाकले. न्यूज पोर्टलला चीनकडून निधी मिळत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. खुद्द पत्रकार अभिसार शर्मा यांनी ट्वीट करून कारवाईची माहिती दिली आहे.


अभिसार शर्मा यांनी ट्विट केले की, "दिल्ली पोलीस सकाळी माझ्या घरी पोहोचले आणि माझा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे."






पत्रकार भाषा सिंह यांच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला आहे. भाषा यांनीही ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय की, "हे माझं शेवटचं ट्वीट आहे. दिल्ली पोलिसांनी माझा मोबाईल जप्त केला आहे."






प्रकरण नेमकं काय? 


न्यू यॉर्क टाईम्स (The New York Times) मधील एका रिपोर्टमध्ये नेव्हिल रॉय सिंघम  (Neville Roy Singham), ज्यानं न्यूजक्लिक (NewsClick) या न्यूज वेबसाईटला आर्थिक मदत केली आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात संबंध असल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेव्हिल रॉय सिंघमच्या नेटवर्कनं चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिलं आणि चीन समर्थक संदेशांचा प्रचार करून मुख्य प्रवाहातील काही प्रकरणांवर प्रभाव टाकला. 


केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत न्यूजक्लिकवर छापेमारीची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, सिंघमनं न्यूजक्लिकला आर्थिक मदत केली आहे. तसेच, चीनकडूनही त्यांना आर्थिक मदत केली जात आहे.


2021 मध्ये, ईडीनं (ED) नवी दिल्लीतील न्यूजक्लिकची विदेशी फंडिंगबाबत चौकशी सुरू केली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ईडीनं कथितरित्या 30.51 कोटी रुपये विदेशी फंडिंग मिळाल्याप्रकरणाची चौकशी केली. तसेच, यासंदर्भात न्यूजक्लिकच्या कार्यालयांवर आणि त्याच्या संचालकांच्या निवासस्थानांवर छापे टाकले होते.