Mega Plantation Drive in Delhi : दिल्ली सरकार यावर्षी वृक्षारोपणाचे महाअभियान राबवणार आहे. यावर्षी दिल्लीत 35.38 लाख झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय (Gopal Rai) यांनी वृक्षारोपणाबाबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली, यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. केजरीवाल सरकारने केलेल्या सर्व उपाययोजनांमुळे दिल्लीच्या अंतर्गत ग्रीन कव्हरमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या दिशेने दिल्ली सरकारने 2022-2023 या आर्थिक वर्षात आणखी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 


वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत दिल्लीत यावर्षी सुमारे 35 लाख 38 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दीष्ट सर्व संबंधित 19 विभागांकडून पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी  घेतलेल्या बैठकीत MCD, DDA, रेल्वे, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, CPWD, DSIIDC, BSES, NDPL यासह सर्व संबंधित 19 विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 


7 लाख झाडांचे मोफत वाटप


वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विभागांद्वारे 29 लाख रोपे लावली जातील. यामध्ये सुमारे 7 लाख रोपांचे मोफत वाटपही केले जाईल. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत मे आणि जून महिन्यात माती तयार करणे, खड्डे खोदणे, रोपे तयार करणे, मातीची सुपीकता यासारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. जुलै महिन्यापासून मेगा वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले.


ग्रीन हेल्पलाइन क्रमांक जारी 


2013 मध्ये जिथे 20 टक्के हरित क्षेत्र होते, तिथे केजरीवाल सरकारच्या प्रयत्नांमुळे 2021 मध्ये 23.06 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तसेच, शहरांच्या दरडोई वनाच्छादनाच्या बाबतीत दिल्ली संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती देखील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली. यासोबतच दिल्ली सरकारने 1800118600 हा ग्रीन हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे. यावर कॉल करुन मेगा वृक्षारोपण मोहिमेची माहिती मिळू शकते. या मोहिमेच अधिकाधिक नागरिकांना सहभाग नोंदवावा असे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.


वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत दिल्लीत गेल्या वर्षी लावलेल्या रोपांचे जगण्याचे प्रमाण तपासण्यासाठी सर्व संबंधित विभागांना थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत कोणत्याही विभागाचे थर्ड पार्टी ऑडिट झाले नसेल, तर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्बेटिंग क्लायमेट चेंज (एमजीआयसीसी) कडून ऑडिट करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संस्थेकडून वृक्षारोपणाशी संबंधित पुढील थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी पर्यावर मंत्र्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: