Delhi MCD Results 2022 : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) कमाल केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत (Delhi MCD Election Results 2022) आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची (BJP) दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे.


दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (7 डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते.  दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.


आम आदमी पक्षाला बहुमत
दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल (दुपारी 2 वाजेपर्यंत) हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने 7 जागांवर विजय संपादन केला आहे. तर 3 अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही 17 जागांचे निकाल येणं बाकी आहे. 


भाजपचं पसमांदा कार्ड फेल
पसमांदा कार्ड खेळत भाजपने एमसीडी निवडणुकीत चार पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. यामध्ये तीन महिला होत्या. पसमांदा मुस्लीम हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सर्वात मागासलेले समजले जातात. यामध्ये अन्सारी, कुरेशी, मन्सुरी, सिद्दीकी अशा 41 जातींचा समावेश आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा एकही मुस्लीम उमेदवार विजयी होताना दिसत नाहीत.


आप कार्यकर्त्यांचा जल्लोष 
कलांमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन सुरु आहे. तर मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


VIDEO : Delhi MCD Election Results 2022 : दिल्ली पालिका निवडणुकीत आपचा विजय, आपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष



दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी 13638 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत सुमारे 50 टक्के मतदान झालं होतं. यामध्ये सर्वाधिक मतदान 65.72 टक्के प्रभाग क्रमांक 5 बख्तावरपूर इथे तर सर्वात कमी 33.74 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 145 अँड्र्यूज गंज इथे झालं होतं. 2017 च्या दिल्ली महापालिका निवडणुकी भाजपने 270 पैकी 181 प्रभाग जिंकले होते. या निवडणुकीत आपने 48 तर काँग्रेसला 27 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकी 53 टक्के मतदान झालं होतं.