Delhi MCD Election 2022 : महाराष्ट्रात मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या असताना दिल्ली महापालिकेची निवडणूक  (Delhi Municipal Corporation) आज जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेची मुदत फेब्रुवारीमध्ये तर दिल्ली महापालिकेची मुदत त्यानंतर एप्रिलमध्ये संपली होती. पण आता हे वेळापत्रक जाहीर झालं आहे. या वेळापत्रकामुळे गुजरातमध्ये जोर लावणाऱ्या केजरीवाल यांनाही एका अडचणीचा सामना करावा लागणार आहे. दिल्ली महानगरपालिकामध्ये चार डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर सात डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 


दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा आज अखेर झाली.  चार डिसेंबर रोजी मतदान तर सात डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पण निवडणुका जाहीर झाल्या यापेक्षाही त्या ज्या टायमिंगला जाहीर झाल्या त्याचीच फार चर्चा सुरु आहे. कारण गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्ष ताकद लावत असतानाच दिल्ली महापालिकेतही त्यांची शक्ती अडकून पडेल. 






असं हे वेळापत्रक आहे
-नोटिफिकेशन- 7 नोव्हेंबर
-अर्ज करण्याची अखेरची तारीख - 14 नोव्हेंबर
- अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख  - 19 नोव्हेंबर
-मतदान- 4 डिसेंबर
-मतमोजणी - 7 डिसेंबर 




दिल्ली महापालिकेची मुदत एप्रिल महिन्यातच संपली होती. दिल्लीत आधी तीन महापालिका होत्या, त्या आता एकत्रित करुन एकच महापालिका केंद्र सरकारनं केली आहे. त्यामुळे नव्या वॉर्ड रचनेसाठी या निवडणुका लांबल्याचं सांगितलं जातंय. तीन महापालिकांमध्ये मिळून आधी 272 वॉर्ड होते, नव्या एकत्रित महापालिकेत ही संख्या कमी होऊन 250 वॉर्ड इतकी करण्यात आलीय. दिल्लीच्या तीनही महापालिका गेली 10 वर्षे भाजपच्या ताब्यात होत्या. दिल्लीत सलग दुसऱ्यांदा सरकार बनवल्यानंतर केजरीवाल आता दिल्ली महापालिकाही नजर ठेवून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या कचऱ्यावरुन जोरदार वाकयुद्धही सुरु होतं. पण एकाचवेळी गुजरात आणि दिल्ली महापालिका जाहीर झाल्यानं केजरीवाल यांना नेमकी कशाला प्राथमिकता द्यायची हा प्रश्न पडू शकतो. 


साहजिकच आम आदमी पक्षाचं मूळ नेटवर्क हे दिल्लीत अधिक आहे. गुजरातसाठी बरीचशी यंत्रणा त्यांना दिल्लीतूनच उभी करावी लागते. पण आता एकाचवेळी त्यांना या दोन परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे. दिल्लीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा रान पेटलेलं असतानाच आता त्यात महापालिका निवडणुकांमुळे ही लढाई आणखी तीव्र होईल. दिल्ली महापालिका निवडणूक तर घोषित झाली. दिल्ली महापालिकेची मुदत एप्रिलमध्ये संपली, पण त्याच्या आधी मुंबई आणि राज्यातल्या 15 महापालिकांची मुदत संपली आहे. मुंबई महापालिकेतल्या वॉर्ड रचनेचा मुद्दा कोर्टात गेल्यानं निवडणूक लांबणीवर आहे. आता ती कधी होते याचीही उत्सुकता असेल. 


आणखी वाचा :
27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचा झेंडा, केजरीवालांचा आप पक्ष भाजपचा अश्वमेध रोखणार?