Delhi Coronavirus Cases :  राजधानी नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानीमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहून दिल्लीमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये मागील 24 तासांत 1042 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत 757 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या तीन हजार 253 इतकी झाली आहे.  गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये 956 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर बुधवारी राजधानीमध्ये एक हजार 9 रुग्ण आढळले होते. राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहाता राज्य सरकारने निर्बंध जारी केले आहेत. 




मास्क अनिवार्य, दिल्ली सरकारचा निर्णय -
 कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.  जर आपण राजधानी दिल्लीमध्ये (National Capitol)आपल्या गाडीतून एकटे प्रवास करत असाल तर आपल्याला मास्क (Wearing Mask) घालणं आवश्यक नाही. मात्र दिल्ली (Delhi)मध्ये आता सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विना मास्क आढळणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.  कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून दिल्ली सरकारनं याबाबत आदेश जारी केले आहेत. मात्र खाजगी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना मात्र हे बंधनकारक नसेल.  


देशात पुन्हा कोरोना वाढतोय -
कोरोनाचा विळखा वाढू लागल्यानंतर काही राज्यात मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले आहे. दिल्ली नोएडा, गाझियाबाद, पंजाब आणि हरियाणामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यातआला. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन वर्ग भरले आहेत. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसत आहे. राज्यात सध्या मास्क सक्तीचा नाही.