BJP Leader Shahnawaz Hussain:  दिल्ली हायकोर्टाने केंद्र आणि बिहार सरकारमधील माजी मंत्री, भाजप नेते शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांना मोठा धक्का दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) कनिष्ठ कोर्टाचे आदेश कायम ठेवत हुसैन यांची याचिका फेटाळून लावली. हुसैन यांच्याविरोधात लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 


वर्ष 2018 मध्ये  एका महिलेने बिहार सरकारचे मंत्री शाहनवाज हुसैन यांच्यावर आरोप लावले होते. हुसैन यांनी छतरपूर येथील फार्म हाऊसवर बलात्कार केला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हुसैन यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. 


या प्रकरणी पोलिसांनी शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यावेळी कनिष्ठ कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळून लावत फटकारले. शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो असे म्हटले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा असे आदेश कोर्टाने दिले होते. कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आले. मात्र, दिल्ली हायकोर्टाने कनिष्ठ कोर्टाचा निकाल कायम ठेवला. पोलिसांनी बलात्कार आणि इतर गुन्ह्यांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले. दिल्ली पोलिसांनी तीन महिन्यात आपला तपास पूर्ण करून कनिष्ठ कोर्टासमोर अहवाल ठेवावा असेही निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले. 


शाहनवाज हुसैन हे बिहारमधील भाजपचे नेते असून विधान परिषदेचे आमदार आहेत. नुकत्याच पायउतार झालेल्या भाजप-जनता दल युनायटेड सरकारमध्ये ते मंत्री होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हुसैन हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री होते. शाहनवाज हुसैन हे 2014 मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. मात्र, पक्षात ते कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी हुसैन विधान परिषदेत निवडून गेले होते. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री होते.