Jammu and Kashmir News : गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) जवानांना अनेक दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागत आहे. काल (बुधवारी) आणखी एक दहशतवादी कारवाई झाली. जम्मू-काश्मीर पोलीस (Jammu and Kashmir Police) आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) कमांडरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईदरम्यान, एक पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या टोफ गावात आंतरराष्ट्रीय सीमेजवळील अर्निया सेक्टरमधील तुरुंगातून कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद अली हुसैन हा चकमकीत ठार झाला आहे. मोहम्मद अली हुसेन याला शस्त्र जप्तीसाठी घटनास्थळी नेले जात होते. त्याचवेळी ही चकमक झाली.


लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ठार 


घटनास्थळाचा फायदा घेत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर मोहम्मद अली हुसैन यानं पोलीस दलावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी झाडलेल्या गोळीमुळे तो जखमी झाला. यानंतर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


एडीजीपी मुकेश सिंह यांनी माहिती दिली आहे की, जेव्हा शस्त्रांचं पॅकेट उघडलं जात होतं, तेव्हा आरोपींनी एका पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्याची सर्व्हिस रायफल हिसकावली, यादरम्यान एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला. मोहम्मद अली हुसेन हा कारागृहातून सक्रिय होता आणि त्यानं फिर्यादींवर ड्रोनच्या साहाय्यानं शस्त्रं टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.


सुरक्षा दलांनी जप्त केलेल्या ड्रोनमधून सोडलेली शस्त्रं


जम्मूच्या अर्नियामध्ये ड्रोनच्या मदतीनं शस्त्रं टाकल्याच्या प्रकरणात एका आरोपीनं हुसैनची या कारवाईत महत्त्वाची भूमिका उघड केली होती. त्यानंतर टोफ गावातून शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी नेत असताना मोहम्मद अली हुसैन यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :