नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना देशातच अनेकवेळा वर्णभेदाला सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतं. मेघालयातील पारंपरिक वेशभूषेत आलेल्या एका महिलेला राजधानी दिल्लीत अशाच एका अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं.


दिल्ली गोल्फ क्लबमध्ये मेघालयातील खासी जमातीतील एक महिला पारंपरिक पोशाखात गेली होती. मात्र पोशाखामुळे ती नेपाळी वाटत असल्याचं सांगत तिला दिल्ली गोल्फ क्लबमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या घटनेमुळे सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

गोल्फ क्लबच्या एका सदस्याने निवेदिता बर्ठाकूर यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलं होतं. निवेदितांसोबत तैलिन लिंगडोह ही महिला गोल्फ क्लबला गेली होती. 15-20 मिनिटांनी क्लबमधील दोन अधिकाऱ्यांनी तैलिन यांना हटकलं. त्यांची वेशभूषा मोलकरणीच्या युनिफॉर्मशी मिळतीजुळती असल्याचं सांगत निघून जाण्यास सांगितलं. दोघांनी तैलिनविषयी वर्णभेदी टिपणी केल्याचाही आरोप आहे.



'मी जगभर फिरले आहे, भारतातील अनेक भागही पालथे घातले आहेत. सर्वोत्तम हॉटेल आणि क्लब्समध्ये मी जेवले आहे. मात्र माझ्या वेशभूषेमुळे मला कधीच कोणी शिवीगाळ केली नाही' असा दावा तैलिन यांनी केला आहे.

दरम्यान, दिल्ली गोल्फ क्लबने आपली चूक मान्य केली असून संबंधित महिलेची माफी मागितली आहे.