Delhi Saket Court Firing: दिल्लीतील साकेत कोर्टात (Delhi Saket Court) आज भरदिवसा गोळीबार (Firing) करण्यात आला. या गोळीबारात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोर वकिलाचा वेश परिधान करुन आल्याची माहिती आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) दिवसाढवळ्या अशा प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
साकेत कोर्टात (Saket Court) झालेल्या या घटनेने कोर्टाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. न्यू फ्रेंड्स कॉलनीशी संबंधित एका खटल्यात साक्ष देण्यासाठी महिला आली होती. त्यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी तिच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आधीच दबा धरून बसले होते. ज्यावेळी ही साक्षीदार असलेली महिला कोर्टाच्या आवारात आली, त्यावेळी तिच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेवर चार गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी कोर्टात पिस्तुलासह प्रवेश केल्याने सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक असल्याचे समोर आले आहे, असे साकेत कोर्टातील वकिलांनी म्हटले.
साकेत कोर्टात दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे दिल्लीतील कोर्टातील सुरक्षेची व्यवस्था कशी आहे, यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या कठोर निर्देशानंतरही दिल्ली पोलीस चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्यास अपयशी ठरले असल्याची चर्चा सुरू आहे.
याआधीदेखील गोळीबाराच्या घटना
न्यायालयाच्या आवारात गोळीबाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी 24 सप्टेंबर 2021 रोजी वकिलांच्या वेशात आलेल्या दोन सशस्त्र बदमाशांनी दिल्लीतील रोहिणी कोर्टात गोळीबार केला आणि गँगस्टर जितेंद्र मान उर्फ गोगीची हत्या केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत राहुल त्यागी आणि जगदीप जग्गा हे दोन्ही बंदूकधारी हल्लेखोर जागीच ठार झाले. दोन्ही हल्लेखोर वकिलांच्या वेशात कोर्टरूममध्ये घुसले होते.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात रोहणी कोर्टात दोन वकील आणि त्याच्या एका अशीला जोरदार हाणामारी झाली होती. त्यानंतर गोळीबारही झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात तैनात असलेल्या नागालँड सशस्त्र पोलीस दलाच्या शिपयाने जमिनीवर गोळी झाडली होती.