नवी दिल्ली : सेंट्रल दिल्लीच्या फिल्मिस्तान परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या 30 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती आहे. या आगीत 56 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून गंभीररीत्या भाजलेल्या व्यक्तींना एलएनजेपी, लेडी हार्डिंग आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. केजरीवाल म्हणाले की, ही खूप मोठी दुर्घटना आहे. अद्याप या आगीची कारणं स्पष्ट झालेली नाही. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्ली सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करुन सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिल्ली सरकारने नुकसान भरपाई म्हणून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 1-1 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या आगीतून 50 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत अनेकांचा दम लागून मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. या परिसरात अरुंद गल्ल्या असल्याने मदतकार्य पोहोचविण्यास विलंब होत होता. दिल्ली आणि एनसीआरमध्ये आग लागण्याची ही सर्वात मोठी घटना आहे, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या ठिकाणी कारखान्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करून कामगार झोपले होते. काही वेळाने धूर झाल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यावेळी त्यांनी खिडकीजवळ येत मदतीसाठी आवाज दिला. परिसरातील लोकांनी पोलिसांना आणि अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  या ठिकाणी अनेक मजूर हे बाहेरून कामासाठी आले असल्याचे देखील सांगितले जात आहे.

ज्या कारखान्यात आग लागली तो कारखाना 600 यार्ड एवढा मोठा आहे. या ठिकाणी स्कुल बॅग आणि पॅकेजिंगचे काम होते. पहिल्यांदा या ठिकाणच्या एका इमारतीला आग लागली आणि बघता बघता ही आग आजूबाजूच्या दोन इमारतींमध्ये पसरली. हे कारखाने अत्यंत गर्दीच्या आणि अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत या दुर्घटनेबाबत दुख: व्यक्त केले आहे.  ही खूपच दुख:द घटना घडली, मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.




काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.