Delhi Corona News : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना विकेंड कर्फ्यू हटवण्याचे आणि दुकानं सुरळीत सुरु ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला आहे. राजधानीच्या मुख्यमंत्र्यांनी विकेंड कर्फ्यू हटवण्याबाबत उपराज्यपालांकडे शिफारस केली आहे. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रशासनानं विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. 


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राजधानी दिल्लीमध्ये अनेक निर्बंधही लादले होते. दुकानं खोलण्यासाठी ऑड-इव्हन नियम लागू केला होता. गेल्या काही दिवसांत अनेक व्यापाऱ्यांनी दिल्लीतील ऑड-इव्हन नियमाचा विरोध केला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येतील घट आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी उपराज्यपालांना हा प्रस्ताव पाठवला होता. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पाठवलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे की, खाजगी कार्यालयं 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत सुरु राहतील. 


मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव अशा वेळी पाठवला आहे, जेव्हा दिल्लीमधील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घटताना दिसत आहे. 


कोरोनाचा वाढता विळखा, गेल्या 24 तासांत 3 लाख 47 हजार नवे कोरोनाबाधित 


देशात प्राणघातक कोरोना (Corona) व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन प्रकाराच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 47 हजार 254 नवीन रुग्ण आढळले असून 703 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारांच्या आतापर्यंत 9,692 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील दैनदिंन रुग्णवाढीचा दर 17.94 टक्के आहे.


सक्रिय प्रकरणांची संख्या 20 लाख 18 हजार 825 वर पोहोचली


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 18 हजार 825 झाली आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 88 हजार 396 झाली आहे. आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 2 लाख 51 हजार 777 लोक कोरोनोतून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 58 हजार 806 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा