नवी दिल्ली : दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये शनिवारी ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ऑक्सिजन साठा संपल्याने जवळपास 1 तास 20 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होऊ शकला नाही. ऑक्सिजन न मिळाल्यामुळं 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात एका डॉक्टरचा देखील समावेश आहे. बत्रा हॉस्पिटलमधील या घटनेनंतर दिल्ली हायकोर्टानं म्हटलं आहे की, ऑक्सिजन संपत चालला असल्याची माहिती प्रशासनाला होती तरीही तिथं ऑक्सिजन उशीरा पोहोचला. आता पाणी डोक्याच्या वर गेलंय, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.
आजच्या आज दिल्लीला 480 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा नाही झाला, तर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करू असं कोर्टानं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर दिल्ली हायकोर्टाचे ताशेरे औढले आहेत. दिल्लीतील रूग्णालयांत खाटांची कमतरता असल्याबाबत देखील कोर्टानं बोट उचललं आहे. 1 एप्रिलपासून दहा दिवसांच्यावर दाखल कोरोना रूग्णांची यादी सादर करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दवाखान्यातील ऑक्सिजन संपल्यामुळं बत्रा हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएंटेरोलोजी विभागाचे विभागाध्यक्षांचा देखील मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी सात अन्य रुग्ण देखील यामुळं दगावले. अन्य पाच गंभीर रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.
जम्मूमधील दवाखान्यातही चौघांचा मृत्यू
आज जम्मूमधील बत्रा अस्पतालमध्येही ऑक्सिजन सप्लाय बाधित झाल्यानं चार रुग्णांचा मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलं की, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सप्लाय लगेच देण्यात आला होता. या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांवर देखील उपचार केले जात असल्याची माहिती आहे.