नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बिहारच्या सिवान लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्त्व केलं होतं. शहाबुद्दीन यांनी दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शहाबुद्दीन तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत होते. याचवेळी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जेलच्या डीजींकडून वृत्ताला दुजोरा
सकाळपासूनच मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या मृत्यूचं वृत्त पसरलं होतं.परंत हे खरं आहे की अफवा याबाबत संशय होता. परंतु तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांनी राजदचे माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. कोरोनाची लागण झालेल्या मोहम्मद शहाबुद्दीन यांना 20 एप्रिल रोजी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाकडून शहाबुद्दीन यांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे, असं त्यांनी सांगितलं.
तेजस्वी यादव यांच्याकडून दु:ख व्यक्त
शहाबुद्दीन यांच्या निधनावर बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त वेदनादायीध आहे. ईश्वर त्यांना स्वर्गात जागा देवो ही इच्छा. कुटुंब आणि शुभचिंतकांचं सांत्वन. त्यांचं निधन ही पक्षाची अपरिमित हानी आहे. दु:खाच्या या प्रसंगी राजद त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे."