Arvind kejriwal : "शहरात एक सीरियल किलर आला आहे. हा सीरियल किलर प्रत्येक राज्यातील सरकार पाडण्यात मग्न आहे. हा किलर एकामागून एक हत्या करत आहे. या लोकांनी आजपर्यंत 277 आमदारांना विकत घेतले आहे. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, आसाम, मध्य प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय अशी अनेक सरकारे पाडली आहेत. शहरात एकापाठोपाठ एक खून करणारा सीरियल किलर आहे. लोक सरकार निवडतात आणि हे पाडतात, असा निशाणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर साधला आहे.
आम आदमी पार्टी (आप) सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सभागृहात भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "या लोकांनी मिळून दिल्लीचे सरकार पाडण्याचा कट रचला आहे. त्यासाठी सर्व देशविरोधी शक्ती एकत्र आल्या आहेत. त्यामुळे मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. मनीष सिसोदिया यांच्या घरी 14 तास रेड सुरू होती. गादी आणि उशा फाडून ते संध्याकाळी बाहेर आले. परंतु, त्यांच्या हाती दमडीही लागली नही. 7 ते 8 दिवस छापे टाकले. परंतु, हाती काहीच लागले नाही, असे केजरीवाल म्हणाले.
"तुम्ही भाजपच्या आठ आमदारांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून कोणता घोटाळा झाला आहे असे विचरले तर त्यातील पाच जणांना काहीही माहित नाही म्हणून सांगतील. तर इतर तीघे जण वेगवेगळे घोटाळे सांगतील. कारण खोटे वेगळे आणि सत्य एकच असते. सत्य हे आहे की कोणताही घोटाळा झाला नाही, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
केजरीवाल म्हणाले, "देशात एकच शिक्षणमंत्री आहे. अमेरिकेतील लोकांना विचारले तरी मनीष सिसोदिया हेच शिक्षणमंत्री आहेत असे सांगितले जाते. आप सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव आणणार आहे आणि हे जनतेचेच सरकार असल्याचे दाखवून देईल.
"छापा पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनीष सिसोदिया यांचा फोन आला, भाजपकडून मुख्यमंत्री होण्याची ऑफर आली. मी मागील जन्मात काही कर्म केले असेल, म्हणून त्यांच्यासारखा उपमुख्यमंत्री आम्हाला मिळाला. दिल्लीत सध्या ऑपरेशन लोटस सुरू आहे. दिल्लीत घोडे बाजारासाठी 800 कोटी रुपये ठेवले आहेत. गुजरात आणि इतर राज्यांत त्यांचा गड कोसळत आहे. आम्ही गुजरात निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले तर सर्व तपास बंद होतील, अशा निशाना केजरीवाल यांनी भाजपवर लगावला आहे.