Delhi Air Pollution Pics from NASA : गेल्या अनेक दिवसांपासून देशाच्या राजधानीचं शहर असणारी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. आता नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच, नासानं (NASA) एक सॅटेलाईट फोटो जारी केला आहे. नासानं शेअर केलेल्या या सॅटेलाइट फोटोमध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतांमध्ये जाळण्यात आलेल्या परालीचा (पेंढ्या) धूर दिल्लीच्या दिशेनं जाताना दिसत आहे. 11 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या फोटोनं राष्ट्रीय राजधानी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर धुराखाली झाकला गेल्याचं दिसत आहे. नासाच्या या फोटोमध्ये 'लाल बिंदू'ही दिसत आहेत, जे पंजाब आणि हरियाणातील पराली पेटल्याचं चित्र दर्शवत आहेत. 


11 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलाय फोटो 


नासानं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की, "11 नोव्हेंबर 2021 रोजी सुओमी एनपीपी उपग्रहावर व्हिजीबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडियोमीटर सूट (VIIRS)नं पंजाब आणि हरियाणामध्ये लागलेल्या आगीमुळं भारतातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी एक दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या धुराच्या नदीचा प्राकृतीक रंगातील फोटो आहे." अशातच एका वैज्ञानिकानं लिहिलंय की, यादिवशी जवळपास 22 मिलियन लोक धुरामुळे प्रभावित झाले होते. 



22 मिलियन लोक धुरामुळे प्रभावित 


नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये USRA वैज्ञानिक पवन गुप्ता यांनी म्हटलं की, 11 नोव्हेंबर रोजी धुराच्या लोळांचा आकार आणि क्षेत्रातील जनसंख्येचं घनत्व पाहून मी म्हणेल की, या एका दिवसात अंदाजे 22 दशलक्ष लोक धुरामुळे प्रभावित झाले.


दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात, इतर राज्यांतून येणारे ट्रक सीमांवर रोखण्यास सुरुवात


दिवाळीपासून वायू प्रदूषणाशी झुंजणाऱ्या दिल्ली आणि आसपासच्या परिसराला अद्याप दिलासा मिळालेला नाही. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (Safar) ने सांगितले आहे की, काल (गुरुवारी) सकाळी 6 वाजता राजधानी दिल्लीत एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 362 वर नोंदवला गेला आहे. याचाच अर्थ आजही दिल्लीची हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' आहे.


दिल्लीच्या सीमेवर ट्रकला 'नो एन्ट्री'


प्रदूषण रोखण्यासाठी सीमेवर ट्रकला 'नो एन्ट्री' करण्यात आली आहे. याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून टिकरी सीमेवर अनावश्यक ट्रक थांबवले जात आहेत. दिल्ली सरकारने बुधवारी एक आदेश जारी करून इतर राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या सर्व ट्रक (अत्यावश्यक ट्रक वगळता) 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.