नवी दिल्ली : तीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून दिल्लीत एका 38 वर्षीय इसमाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने गेल्या बारा ते तेरा वर्षांच्या कालावधीत शेकडो मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित आरोपीला पाच मुलं असून त्यापैकी तीन मुली आहेत.

एखादी वस्तू देण्यासाठी तुमच्या पालकांनी मला पाठवलं आहे, असं सांगून आरोपी विद्यार्थिनींना भुलवायचो. त्यांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचो, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. दिल्लीच्या न्यू अशोक नगर भागात आरोपी सुनील रस्तोगीने तिघी जणींना सावज केल्याचं वृत्त आहे.

10 जानेवारीला अपहरणाच्या दोन केसेस न्यू अशोक नगर पोलिसात दाखल झाल्या होत्या. 9 आणि 10 वर्षीय मुलींवर एका इसमाने अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. इमारतीच्या पायऱ्यांवर नेऊन त्याने दुष्कृत्य केल्याची माहिती आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेला आरोपी मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. 1990 मध्ये तो दिल्लीत आला. सध्या तो टेलर म्हणून काम करत होता.