कोलकाता : पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध गंगासागर जत्रेत पुन्हा एकदा चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार बंकिम हाजरा यांचाही समावेश आहे.


कोलकात्यापासून 100 किलोमीटर लांब असलेल्या सागद्वीप म्हणजेच गंगासागरवर जवळपास 15 लाख भाविक स्नानासाठी दाखल झाले होते. याआधीही 2010 मध्ये बोटीवर चढतानाच चेंगराचेंगरी होऊन 7 जणांचा मृत्यू झाला होता.

गंगासागरात पवित्र डुबकी मारुन ज्यावेळी भाविक कोलकात्याच्या दिशेने परतत होते, त्यावेळी बोटीवर चढताना अचानक गर्दी वाढली आणि मोठा गोंधळ झाला. दरम्यान चेंगराचेंगरी वाढली आणि 6 भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बचावाकार्यासाठी पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पश्चिम बंगालचे ग्रामविकास मंत्री सुब्रता मुखर्जी यांच्या माहितीनुसार, मकर सक्रांतीनिमित्त डुबकी मारण्यासाठी आणि कपिल मुनी मंदिरात पूजा करण्यासाठी जवळपास 16 लाख भाविक आले होते.

गंगासागर जत्रा काय आहे?

गंगासागर जत्रेला गंगास्नानही म्हटलं जातं. दरवर्षी होणाऱ्या या जत्रेदरम्यान भाविक गंगेच्या उगमस्थानी डुबकी मारतात. इथून ही नदी बंगालच्या खाडीत पोहोचते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने दरवर्षी गंगासागर जत्रेचं आयोजन केले जाते.