नवी दिल्ली: भविष्यातील संघर्षांसाठी आत्तापासूनच तयारा राहा, असा सूचक इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. सतत विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेने प्रत्येकाला पुन्हा नवे धोरण आखण्यास भाग पाडले आहे. उत्तर आणि पश्चिम सीमा तसेच संपूर्ण किनारपट्टीवर सतत लक्ष ठेवावे लागणार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. सोमवारी ते नौदल कमांडर्स परिषदेत बोलत होते. भविष्यातील सर्व आव्हाने पेलण्याची तयारी ठेवण्याची गरज असल्याचे देखील राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
नौदल कमांडर्ससाठी लष्करी सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नौदल कमांडर्स परिषद 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत जहाजावर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या भविष्यकालीन समस्यांना तोंड देण्यासाठी असणाऱ्या क्षमतेचा आढावा घेण्यात आला आहे. कमांडरना संबोधित करताना सिंह यांनी सामाजिक आणि आर्थिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सागरी सीमा सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या जोमाने काम करत आहे.
संरक्षण क्षेत्र लवकरच मोठी भरारी घेणार
ते म्हणाले की, पुढील 5-10 वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्राच्या माध्यमातून 100 अब्जांपेक्षा जास्त किंमतीच्या ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे. येत्या काळात संरक्षण क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासात एक प्रमुख भागीदार असणार आहे. आज आपले संरक्षण क्षेत्र रन वे वर आहे लवकरच ते मोठी भरारी घेईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देईल. अमृत महोत्सवात भारताला जगातील अव्वल स्थानी पाहायचे असेल, तर संरक्षण महासत्ता बनण्याच्या दिशेने आपण धाडसी पावले उचलली पाहिजेत.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली
भारतासारख्या विशाल देशाने सुरक्षेसाठी इतरांवर अवलंबून न राहता संपूर्णपणे स्वावलंबी होण्याची गरज आहे. चार सकारात्मक स्वदेशीकरण याद्यांची अधिसूचना, एफडीआय मर्यादेत वाढ आणि एमएसएमईसह भारतीय विक्रेत्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे यासह संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :