Defense Expo 2022 : भारताने व्यावसायिकच नव्हे तर लष्करी ताकदीच्या दृष्टीने देखील जागतिक पातळीवर आपलं स्थान उंचावलं आहे. गेल्या काही काळात भारताने तंत्रज्ञानावर भर देत आपली लष्करी ताकद वाढवली आहे. यामुळे अनेक देश भारतासोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. संरक्षण क्षेत्रात भारताकडून सहकार्य अपेक्षित असल्याचं तीन देशांनी म्हटलं आहे. भारतात सध्या डिफेन्स एक्सो 2022 (Defense Expo 2022) सुरु आहे. गुजरातच्या गांधीनगर येथे सुरु असलेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये 20 हून अधिक देशांचे संरक्षण मंत्री सहभागी झाले आहेत.
मालदीव (Maldives), इथोपिया (Ethiopia) आणि मादागास्कर (Madagascar) देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, त्यांना संरक्षण क्षेत्रात भारताच्या सहकार्याची गरज आहे. डिफेन्स एक्स्पोमध्ये सहभागी झाल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिका आणि हिंदी महासागरातील 20 हून अधिक देशांचे संरक्षण मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिफेन्स एक्स्पोमध्ये भाग घेताना देशाच्या स्वदेशी संरक्षण उद्योगाला मित्र देशांनाही शस्त्रे निर्यात करण्याचे आवाहन केलं आहे.
काय म्हणाल्या मालदीवच्या संरक्षण मंत्री?
भारताची 'बहिण' (Sister) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांनी यावेळी म्हटलं ही भारत आणि मालदीवमधील संबंध दीर्घ काळापासून अतिशय मजबूत आहेत. भारताने नेहमीच मालदीवच्या मदतीसाठी तत्परता दाखवली आहे. मालदीववर जेव्हा जेव्हा धोक्याची परिस्थिती ओढवते, तेव्हा भारत मदतीसाठी पुढे येतो. दोन्ही देशांमधील संबंध परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि सहकार्यावर आधारित आहेत. भारत आणि मालदीवच्या सीमा एकमेकांशी जोडलेल्या आहेत पण दोन्ही देशांच्या सीमेवर कधीही वाद झाला नाही. आमच्या संबंधामधून इतर देशांनीही शिकलं पाहिजे, असंही मारिया दीदी यांनी म्हटलं आहे.
एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना मारिया दीदी म्हणाल्या की, भारत हा खूप मोठा देश असून मालदीप खूप लहान जरी असला तरी दोघांसमोरील आव्हाने सारखीच आहेत. पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करताना त्यांनी म्हटलं की, कोविड महामारीदरम्यान भारताने मालदीवसाठी आवश्यक लससाठी उपलब्ध करून दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीचा संदर्भ देत मारिया यांनी म्हटलं की, ते मला 'बहिण' म्हणून संबोधतात. आम्ही दोघेही भाऊ-बहिणीसारखे आहोत.
इथियोपियाचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?
एबीपी न्यूजशी विशेष संवाद साधताना, आफ्रिकन देश इथियोपियाचे संरक्षण मंत्री डॉ. अब्राहम यांनी सांगितलं की, इथियोपियाला त्यांच्या देशाची युद्ध आणि लष्करी क्षमता मजबूत करण्यासाठी भारताकडून संरक्षण सहकार्याची अपेक्षा आहे. डॉ. अब्राहम यांच्या मते, इथिओपियाचे भारताशी खूप जुने संबंध आहेत. मंगळवारी त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत महत्त्वाची बैठकही पार पडली.
काय म्हणाले मादागास्करचे संरक्षण मंत्री?
डिफेन्स एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आलेले मादागास्करचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल राकोटोनिरिका यांनी म्हटलं आहे की, डिफेन्स एक्स्पो आयोजित केल्याबद्दल मी भारताचं अभिनंदन करतो. अशा कार्यक्रमाच्या आयोजनामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. मादागास्कर हा आफ्रिका आणि हिंदी महासागर या दोन्ही प्रदेशांचा भाग आहे.
भारत कोणत्या देशांना शस्त्रे पुरवेल?
भारत आपल्या स्वदेशी शस्त्रास्त्रांसाठी आफ्रिका आणि हिंदी महासागर क्षेत्रातील मित्र राष्ट्रांना शस्त्रे निर्यात करण्यास तयार आहे.