DCGI Approved mRNA COVID-19 Vaccine : ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सकडून mRNA कोविड-19 लसीचे दोन डोस मंजूर केले आहेत. ही लस 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना आपत्कालीन वापरासाठी मिळणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार, DCGI ने आज सीरम इन्स्टिट्यूटच्या Covovax विरोधी कोविड-19 लस ही 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींसह मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली आहे.
शुक्रवारच्या बैठकीत विषय तज्ञ समितीने (SEC) भारतातील पहिल्या m-RNA लसीसाठी आपत्कालीन वापरासाठी (EUA)शिफारस केली. भारताच्या औषध नियामक अंतर्गत विषय तज्ञ समितीने जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने सादर केलेला डेटा समाधानकारक आढळला आहे. कंपनीने एप्रिलमध्ये हा डेटा सादर केला. त्यानंतर त्यांनी मे महिन्यात पुन्हा अतिरिक्त डेटा सादर केला.
mRNA लसीच्या 4000 जणांवर चाचण्या
मे महिन्याच्या सुरुवातीला, जेनोव्हाने फेज-3 डेटा सबमिशन संदर्भात एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये असे लिहिले होते की, "जेनोव्हा नियामक एजन्सीशी संवाद साधत आहे आणि उत्पादन मंजुरीसाठी आवश्यक असलेला सर्व डेटा आणि माहिती सबमिट केली आहे." कंपनीने लस सुरक्षितता, प्रतिकारशक्ती आणि सहनशीलतेचे मूल्यांकन करण्यासाठी 4000 सहभागींवर फेज-2 आणि फेज-3 चाचण्या घेतल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेनोव्हाची एम-आरएनए लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाऊ शकते.
Covovax लस 7-11 वर्षांच्या मुलांसाठी मंजूर
DCGI ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अँटी-COVID-19 लस कोवोव्हॅक्सला 7 वर्षे ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींच्या अधीन मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली. COVID वरील विषय तज्ञ समितीने (SEC) गेल्या आठवड्यात सात ते 11 वर्षे वयोगटासाठी लस आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केल्यानंतर DCGI ची मंजुरी मिळाली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, 16 मार्च रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी या संदर्भात DCGI ला एक विनंती पत्र दिले होते.
भारताची लसीकरण मोहीम
DCGI ने 28 डिसेंबर रोजी प्रौढांसाठी मर्यादित आपत्कालीन वापरासाठी आणि 9 मार्च रोजी 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी काही अटींच्या अधीन राहून Covovax लस मंजूर केली देशात 16 मार्च ते 12 ते 14 वयोगटातील मुलांना अँटी-कोविड लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहीम गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी सुरू झाली होती. कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि त्याची व्याप्ती देशभर विस्तारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, भारत सरकारने मोफत कोविड-19 लस उपलब्ध करून दिली आहे.