Crime News: न उमर की सीमा हो, न जनम का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन... गझलकार जगजित सिंहांच्या या ओळी एका प्रेमीयुगुलानं खऱ्या ठरवल्या आहेत. प्रेम आंधळं असतं, प्रेमात सारं काही माफ असतं, हे आपण नेहमीच ऐकतो. प्रेम करणाऱ्यांसाठी सगळं जग एकीकडे असतं आणि ते आणि त्यांचं प्रेम एकीकडे. मग आपलं प्रेम मिळवण्यासाठी संपूर्ण जगाशी झगडावं लागलं तर बेहत्तर, ते कायम तयार असतात. असंच काहीसं प्रकरण बिहारमधल्या (Bihar Crime) गोपाळगंज (Gopalganj) जिल्ह्यात समोर आलं आहे. 


रविवारी 4 फब्रुवारी रोजी बिहारमधल्या गोपाळगंजमधील भोरे पोलीस स्टेशनमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती. प्रेमात पडलेलं जोडपं एकमेकांशी लग्न करण्यावर ठाम होतं. पण काही लोकांचा मात्र दोघांच्या लग्नाला विरोध होता. लग्न करण्यासाठी इच्छुक असलेली महिला चार मुलींची आई होती. तिच्या पतीचं साधारणतः सहा महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर महिला आपल्या मुलींसह राहत होती. अशातच या विधवा महिलेचं आपल्या चुलत सासऱ्यांवर प्रेम जडलं. सासऱ्यानंही सूनेवर जीव टाकला. कालांतरानं दोघांमधील प्रेम आणखी दृढ झालं आणि समाजाच्या सर्व चौकटी झुगारून दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, दोघांचा हा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. अख्खं कुटुंब दोघांच्या प्रेमाच्या विरोधात उभं ठाकलं आणि त्यांच्या नात्याला विरोध करू लागलं. 


नेमकं झालं काय? 


लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, असा धाक दाखवत कुटुंबीयांनी महिलेला लग्न करण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. कालांतरानं प्रकरण इतकं वाढलं की, पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचलं. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनीही दोघांना (प्रेमात पडलेल्या सून आणि सासऱ्याला) समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांना समाजाच्या चौकटी, समाजाचे नियम यांचे पाठ पढवले. मात्र, दोघेही ऐकायला तयार नव्हते. दोघंही लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होते. नाईलाजानं पोलीस स्थानकातच पोलीस अधिकाऱ्यांसमोर दोघांचं लग्न लावण्यात आलं. पोलीस ठाणे प्रभारींच्या उपस्थितीत दोघांनी पोलीस ठाण्यात बांधलेल्या मंदिरात एकमेकांना पुष्पहार घातला. त्यानंतर सासऱ्यानं सुनेच्या भांगात कुंकू भरुन तिला आपली अर्धांगिनी केलं. 


नवऱ्याच्या निधनानंतर सासऱ्यावर जीव जडला


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपलागंज जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीतील डुबवालिया गावातील तरुणाचा सहा महिन्यांपूर्वी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्याची पत्नी सीमा देवी विधवा झाली. तिच्या पदरात चार मुलं आहेत. आता त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तिच्या एकटीच्याच खांद्यावर आली. एकटीनं आयुष्य काढणं तिच्यासाठी फार कठीण जात होतं. तिच्यावर आभाळ कोसळलं, त्यावेळी तिच्या मदतीसाठी आणि तिला आधार देण्यासाठी तिचे चुलत सासरे देवदूताप्रमाणे धावून आले. मुलांची आणि विधवा महिलेची काळजी घेऊ लागले. तिच्यावर आणि तिच्या मुलांवर केलं जाणारं प्रेम पाहून विधवा महिला भारावून गेली आणि त्याचवेळी चुलत सासऱ्यांवर तिचा जीव जडला. 


महिला आणि चुलत सासऱ्यांच्या प्रेमसंबंधांची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. कुटुंबीयांनी दोघांच्या नात्याला कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली. पण दोघंही आपल्या प्रेमावर आणि लग्न करण्यावर ठाम राहिले. त्यानंतर नाईलाजानं लोकांना दोघांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांनी समजावलं पण दोघांनीही ऐकलं नाही. शेवटी पोलीस ठाण्यातच दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. महिलेशी लग्न करणाऱ्या सासऱ्यानं लग्नाबाबत सांगताना म्हटलं की, गेल्या एक महिन्यापासून आमचं एकमेकांवर प्रेम आहे. ते सीमाशी लग्न करुन खूप खूश आहेत. आम्हा दोघांनाही नवं आयुष्य मिळालं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Crime News: एका 'नो बॉल'मुळे आयुष्य संपलं; खेळाडूला जबर मारहाण, दुर्दैवी अंत