Weather Update Today : उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. आज मंगळवारीही अनेक राज्यांमध्ये थंडीसह दाट धुक्याची शक्यता आहे. तर काही भागात पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागातही थंडी वाढली आह. पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. मैदानी भागातील तापमानातही मोठी घट झाली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पहाटे धुक्यासह थंडी पडेल आणि दुपारी तापमानात वाढ होईल.


मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मेघगर्जनेसह दिल्ली आणि आसपासच्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून काश्मीरमध्ये हवामान सुधारण्याची अपेक्षा आहे. तसेच, 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


थंडीने पुन्हा जोर पकडला


उत्तर भारतातील बदलत्या हवामानामुळे थंडीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. राजस्थानमधील सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये पाऊस झाला आहे. आजपासून अनेक राज्यांमध्ये कोरडे हवामान पाहायला मिळणार असून आणि पारा वाढण्याची शक्यता आहे. तर, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये आणखी बर्फवृष्टी होईल, त्यामुळे पर्यटकांसाठी आल्हाददायक वातावरण तयार झालं आहे. 


दाट धुक्यासह थंडीचा कडाका


दरम्यान, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह मैदानी राज्यांमध्ये थंडी कायम आहे. सकाळी दाट धुके पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सकाळच्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेता येईल कारण धुके कमी असेल, त्यानंतर दिवसा आकाश निरभ्र राहिल.


'या' भागात पावसाची शक्यता


आज म्हणजेच 6 फेब्रुवारीला उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. एवढंच नाही तर पंजाब, हरियाणा आणि आसामच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशात बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात जोरदार वारे वाहतील आणि थंडी कायम राहील.