लखनऊ: देशातील इस्लामचे शिक्षण देणारी प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या दार-उल उलूम देवबंदने नुकताच ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात चर्चेत आलेला धर्म प्रसारक डॉ. झाकीर नाईकच्या विरोधात फतवा काढला. पण याला सोशल मीडियावरून प्रसारीत करण्यात आल्याने देवबंदने नाराजी व्यक्त केली आहे.


 

दार-उल-उलूम देवबंदचे प्रवक्ता अशरफ उस्मानी यांनी देलेल्या प्रतिक्रीयेत, काही वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेलमधून देवबंदने झाकीर नाईक विरोध काढलेल्या फतव्याचा उल्लेख करत आहेत. नाईकच्या दहशतवादी संघटनांशी संबंध खरे ठरवण्यासाठी दार-उल-उलूम देवबंदने काढलेल्या फतव्याचा वापर केला जात आहे. वास्तविक हे एखाद्या घटने संदर्भात दिलेल्या प्रतिक्रीयेला वेगळ्याच घटनेतील प्रतिक्रीयेशी जोडण्यासारखे आहे.

 

उस्मानी यांनी सांगितले की, ''नाईक विरोधात काढलेला फतवा हा, मसलक(मुस्लीम समाजातील काही वर्ग)शी संदर्भात आहे. अशावेळी नाईकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधासाठी या फतव्याचा वापर करणे चुकीचे आहे.''

उस्मानी म्हणाले की, ''रमजान महिन्यातील रोजे आणि ईदच्या व्यस्ततेमुळे दार-उल-उलूमला नाईक प्रकरणावर भूमिका घेण्यास उशीर झाला. संस्था या विषयावर येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.''

 

दरम्यान नाईक प्रकरणावरून मुस्लीम धर्मगुरूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे वरिष्ठ सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांच्या मते, हा सर्व प्रकार नाईकची चोहोबाजूंनी नाकेबंदी करण्याच्या षडयंत्राचा भाग आहे. मुसलमानांमध्ये यावरून कितपत एकवाक्यता आहे हे पाहिले जात आहे.

 

ते म्हणाले की, ''सरकारने नाईकची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. याचे स्वागतच आहे. तुमचा ज्याच्यावर संशय असेल त्याची निश्चितच चौकशी झालीच पाहिजे. पण या चौकशीचा अहवाल येण्याआधीच नाईकचे चारित्र्यहनन करणे अयोग्य आहे.''

 

जगभरात प्रमुख इस्लामी संशोधन संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या दार-उल-मुसन्निफीन शिबली अकादमीचे निर्देशक प्रोफेसर इश्तियाक अहमद जिल्ली यांच्या मते, ''कोणी काय म्हणले यावर मी प्रतिक्रीया देणार नाही. पण, कोणत्याही व्यक्तीला देशातील कायद्याच्या चौकटीत राहूनच आपले मत प्रदर्शन केले पाहिजे. मीडिया कोणत्याही प्रकरणावरून न्यायधीशाच्या भूमिकेत येते हे संपूर्णपणे चुकीचे आहे.''

 

तर दुसरीकडे ऑल इंडिया शिय्या पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी नाईकचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. त्यांच्या मते वाहाबी विचारांवर विश्वास ठेवणारे लोक नाईकचे भाषण ऐकून प्रेरित होत आहेत. आणि दहशतवादाच्या मार्गाकडे वळत आहेत.

 

त्यांनी नाईकवर कडक करवाईची मागणी केली असून, त्याच्या भाषणावर बंदी घालून त्याचे भारतीय नागरिकत्वही रद्द केले पाहिजे, अशी मागणी केली आहे.