नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांशी आज संवाद साधला. देशात अनलॉक-2 लागू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पावसाळा आला असल्याने स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन नागरिकांनी योग्य पद्धतीने केल्याने भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. राज्य सरकार, देशातील नागरिक आणि संस्थांनी अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. नियमांचं पालन करणाऱ्यांना समजावलं पाहिजे. अनलॉक-1 मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना दिलसा आहे, ही बाब चिंताजनक आहे. देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखे आहेत.


गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार


गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी नागरिकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ तसेच एक किलो चणा मिळणार आहे.  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. यामध्ये मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर हा खर्च दीड लाख कोटींच्या घरात जातो.


देशात 'वन नेशन, वन रेशनकार्ड'


आता संपूर्ण भारतासाठी एक रेशनकार्डचीही व्यवस्था केली जात आहे. म्हणजेच वन नेशन वन रेशनकार्ड असणार आहे. वन नेशन वन रेशन कार्डचा सर्वात मोठा फायदा गरीब लोकांना होईल, जे  पोटापाण्यासाठी आपलं गाव सोडून इतरत्र नोकरीसाठी जातात.


गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी गरीब कुटुंबाच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. या काळात 9 हजाराहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी जमा झाले आहेत. या कोरोना संकटात गोरगरीब व वंचितांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने पूर्ण व्यवस्था केली आहे.


PM Gareeb Kalyan Yojana| पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबरपर्यंत गरजूंना मोफत धान्य