नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन झालेली हकालपट्टी बेकायदेशीर असून पुन्हा कंपनीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएलएटी) आदेश दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचा आणि शेअरधारकांचा मिस्त्री यांच्यावर विश्वास राहिला नाही, असे सांगून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. कंपनी लवादच्या निर्णयानं मिस्त्रींच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.


टाटा उद्योग समूहाची धारक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्टोबर 2016 साली तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. अवघ्या 42 व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना चार वर्षातच भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले हे बघून सर्वांनाच धक्का बसला होता.

टाटा समूहातील सुशासनाचा आग्रह धरणाऱ्या मिस्त्री यांनी विश्‍वस्तांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यानंतर मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती. दोन्ही बाजूंनी न्यायालयात आणि कंपनी कायदा लवादाकडे दाद मागण्यात आली. या संघर्षात कधी मिस्त्री तर कधी टाटा समूहाची सरशी झाली, मात्र गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण कंपनी कायदा लवादाकडे प्रलंबित होते.

एनसीएलटी ने आज दिलेल्या निर्णयानुसार सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय चुकीचा आहे. सायरस मिस्त्री टाटा सन्स समूहाचे सहावे अध्यक्ष होते. 2012 साली रतन टाटा यांच्यानंतर मिस्त्री यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला होता.

टाटा सन्सच्या बोर्डाने सायरस मिस्त्री यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप करत त्यांना अध्यक्षपदावरून काढले होते. त्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या सहा कंपनीचा राजीनामा दिला आणि आरोपाविरोधात
एनसीएलटीकडे दाद मागितली.

टाटा समूहाचे शेअर्स कोसळले

एनसीएलएटीच्या निर्णयानंतर टाटा समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले. टाटा ग्लोबल बेव्हरेजचे 4.14, टाटा कॉफीमध्ये 3.88 टक्के आणि टाटा मोटर्सचे 3.05 टक्क्यांनी घसरले. तर इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअरमध्ये 2.48 टक्के, टाटा केमिकल्समध्ये 1.65 टक्के, टाटा इन्व्हेसमेन्टमध्ये 1.22 टक्के आणि टाटा पॉवर कंपनीमध्ये 0.98 टक्क्यांनी शेअर खाली आले आहे. टीसीएसच्या शेअरमध्ये 0.07 टक्के एवढी किरकोळ वाढ झाली आहे.