Cyclone Remal: बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ रेमल आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. या चक्रीवादळाचा (Cyclone Remal) फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला जाणवतोय. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतोय. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग 100 ते110 किमी होता. तसंच अनेक भागात झाडं कोसळली आहेत. उत्तर दिशेने चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. मात्र जमिनीवरील प्रवास सुरू झाल्याने कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलंय. किनारपट्टी भागातल्या 1 लाख 10 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींनीही चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला.
रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री 8.30 वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे वादळ किनारपट्टीपासून 30 किमी दूर होते. मात्र, हळूहळू ते जवळ आले आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले. रेमल वादळामुळे लाकडाची किंवा बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडेही उन्मळून पडली. अनेक किनारी भागात विजेचे खांबही उन्मळून पडल्याचे दिसून आले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिघा येथील किनारपट्टीवर उंच लाटा उसळताना दिसत आहेत. रेमलमुळे पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला आहे.
बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
बांग्लादेशमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर एवढा वाढला की, किनाऱ्यालगत उभ्या असलेल्या बोटी पाण्याने भरल्या. मातीची आणि बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. किनाऱ्यालगतचे शेत आणि सखल भाग जलमय झाला आहे. घरांची छत उडाली, विजेचे खांब तुटले आणि अनेक भागात झाडे उन्मळून पडली. कोलकात्याला लागून असलेल्या सखल भागातील रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.
दक्षिण बंगालमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा प्रभाव
भारतीय हवामान विभागाचे सोमनाथ दत्ता म्हणाले की, दक्षिण बंगालमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा प्रभाव दिसून येईल. वादळाचा तडाखा बसल्यापासून बंगालच्या किनारपट्टीपासून ते कोलकातापर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. IMD ने ईशान्य भारतातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. चिरांग, गोलपारा, बक्सा, दिमा हासाओ, कचार, हैलाकांडी आणि करीमगंज जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, धुबरी, दक्षिण सलमारा, बोंगाईगाव, बजाली, तामुलपूर, बारपेटा, नलबारी, मोरीगाव, नागाव, होजई आणि पश्चिम कार्बी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रेल्वेच्या काही गाड्या रद्द
कोलकात्यासह दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये NDRF च्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने एसडीआरएफ टीमही तयार केल्या आहेत चक्रीवादळामुळे रस्ते आणि विमान प्रवासही प्रभावित झाला आहे. कोलकाता ते दक्षिण बंगालपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत. कोलकाताचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे 394 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
हे ही वाचा :