Cyclone Mocha Update : मोखा चक्रीवादळ (Cyclone Mocha) हळूहळू गंभीर रुप धारण करत आहे. हे चक्रीवादळ हळूहळू बांगलादेश-म्यानमारच्या समुद्रकिनार्‍याकडे सरकत असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर म्यानमार आणि बांगलादेशमध्येही तयारी करण्यात आली आहे. सखल भागातील लोकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हवामान विभागाने ट्वीट करत म्हटलं आहे की, "मोखा चक्रीवादळ केंद्र 12 मे 2023 रोजी वायव्य पोर्ट ब्लेअरपासून सुमारे 520 किमी अंतरावर मध्य बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला होतं." मोखा चक्रीवादळ रविवारी (14 मे) बांगलादेश-म्यानमार सीमेवर धडकू शकते. ताशी 175 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत.


 






14 मे रोजी वादळाचं रुपांतर अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार


एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, NDRF च्या दुसऱ्या बटालियनचे कमांडंट गुरमिंदर सिंग यांनी सांगितलं की, मोखा चक्रीवादळाचं 12 मे रोजी तीव्र चक्रीवादळात आणि 14 मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्याचवेळी भुवनेश्वरमधील आयएमडीचे वरिष्ठ अधिकारी संजीव द्विवेदी यांनी अंदाज वर्तवला आहे की, 12 मे रोजी संध्याकाळी मध्य बंगालच्या उपसागरावर त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.


ईशान्येकडील राज्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम


या चक्रीवादळाचा परिणआम ईशान्येकडील राज्यांमध्ये दिसून येईल. त्रिपुरा आणि मिझोराममध्ये शनिवारी (13 मे) मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये रविवारी (14 मे) पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील चक्रीवादळाचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफने 8 पथकं तैनात केली आहेत, तर 200 जवान बचावकार्यासाठी मैदानात उतरले आहेत. तसंच 100 जवानांना तयारीत ठेवण्यात आलं आहे.


भारतीय हवामान विभागाचा मच्छिमारांना इशारा


दुसीरकेड भारतीय हवामान विभागाने मच्छिमार, जहाजं, बोटी आणि ट्रॉलर यांना रविवारपर्यंत मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर, उत्तर अंदमान समुद्रात जाऊ नये असं सांगितलं आहे. तसंच, बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात जाणाऱ्यांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तत्पूर्वी, भारतीय तटरक्षक दलानेही मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला होता.