PM Modi Gujarat Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरात (Gujrat) दौऱ्यावर असणार आहेत. सुमारे 4,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत 19,000 लाभार्थ्यांना घरांचं वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (आज) गुजरातला भेट देणार आहेत.


पंतप्रधान कार्यालयानं (PMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मोदी गांधीनगरमधील अखिल भारतीय शिक्षा संघ अधिवेशनाला उपस्थित राहणार असून गिफ्ट सिटीलाही भेट देतील. गांधीनगरमधील कार्यक्रमादरम्यान मोदी 2,450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील, अशी माहितीही निवेदनातून जारी करण्यात आली आहे.


केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत 19,000 लाभार्थ्यांना घरं


यामध्ये नगरविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि वाहतूक विभाग, खाण आणि खनिज विभागाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करतील. या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे 1,950 कोटी रुपये आहे.


राज्यातील शिक्षकांनाही भेटी देणार 


गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी (गिफ्ट सिटी) च्या भेटीदरम्यान मोदी तिथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थितीचा आढावा घेतील, असं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे. यादरम्यान ते अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि भविष्यातील योजना समजून घेतील. अखिल भारतीय शिक्षण संघ अधिवेशन हे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे 29 वे द्विवार्षिक संमेलन आहे. सेंटर ऑफ ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशनमधील शिक्षक ही या परिषदेची थीम आहे.


लवकरच पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अनेकवेळा अमेरिकेला भेट दिली, मात्र त्यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी अधिकृत राज्य दौऱ्यावर अमेरिकेला जात आहेत. त्यांचा दौरा जून महिन्यात होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती भवन व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन मोदींचं स्वागत करतील. खरं तर, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात अनेकदा अमेरिकेला भेट दिली आहे. पण यापैकी एकही भेट हा त्यांचा अधिकृत राज्य दौरा नव्हता. नोव्हेंबर 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भारतीय पंतप्रधान म्हणून अमेरिकेचा शेवटचा राजकीय दौरा केला होता.


व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितलं की, 'राष्ट्रपती जो बायडन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत राजकीय दौऱ्यावर असताना स्वागत करतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यात 22 जून रोजी स्नेहभोजनाचं आयोजनही करण्यात आलं आहे.