Cyclone Biparjoy Update : अत्यंत तीव्र बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) हळूहळू गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) सुमारे 48 तासांनी भारतातील गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची येथील किनारपट्टी धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
48 तासांत भारतात धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'बिपरजॉय चक्रीवादळ 13 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता वर ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर केंद्रीत झालं आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ पार करण्याची शक्यता आहे.' आयएमडीने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट
चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका गुजरात किनारपट्टीला असल्याचं बोललं जात आहे. यामुळे मांडवी, पोरंबदर आणि कच्छ तसेच इतर किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
किनारपट्टी भागातील लोकांचं स्थलांतर
बिपरजॉय चक्रीवादळ धडकण्याआधी गुजरातमध्ये हवामानात मोठा बदल झाला आहे. सोसाट्यानं वादळी वारे वाहत असून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना सुरु असून किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं काम सुरु आहे. गुजरात किनारपट्टी भागातील शाळा आणि बंदरे बंद करण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये अनेक ट्रेनही रद्द करण्यात आल्या आहेत.
'मोखा'नंतरचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळ तयार झालं. हे चक्रीवादळ मोखा नंतरचं सर्वात शक्तीशाली वादळ असल्याचं सांगितलं जातं आहे. 'मोखा' चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं होतं. बिपरजॉय चक्रीवादळाची अत्यंत तीव्र श्रेणीमध्ये नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 67 रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना