Cyclone Biparjoy : 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळं (Cyclone Biparjoy) गुजरातमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं कच्छ आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळामुळं 23 जण जखमी झाले आहेत. तर राज्यातील किमान एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. 


गुजरातमध्ये वादळ येण्यापूर्वी दोन जणांचा मृत्यू झाला होता. परंतु वादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुजरात प्रशासन आणि इतर यंत्रणांनी नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे. वादळामुळं राज्यातील किमान एक हजार गावांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी 40 टक्के वीज संकट एकट्या कच्छ जिल्ह्यात आहे. 500 कच्च्या झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तर काही पक्क्या घरांचेही नुकसान झाले आहे. 800 झाडे उन्मळून पडली आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आणि बाधितांना मदत करण्यासाठी काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


गुजरातमध्ये NDRF च्या 18 तुकड्या तर महाराष्ट्रात पाच तुकड्या तैनात 


गुजरातच्या किनारी भागात पोहोचल्यानंतर काही तासांनी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकल्याने ते कमकुवत झाले आहे. हे चक्रीवादळ आता दक्षिण राजस्थानकडे सरकत आहे. एनडीआरएफने राज्य सरकारशी सल्लामसलत करून जालोरमध्ये आधीच एक टीम तैनात केली आहे, कारण अतिवृष्टीमुळे पूर येण्याचा आणि लोक अडकण्याचा धोका आहे. NDRF च्या 18 तुकड्या गुजरातमध्ये बोटीसह बचाव कार्यासाठी तैनात आहेत. चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात पाच आणि कर्नाटकात चार पथके तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता


बिपरजॉय चक्रीवादळामुळं गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील काही दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागानं केलं आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळं गुजरातमधील किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळं गुजरातमध्ये 22 जण जखमी तर 23 जनावरांचा मृत्यू, 940 गावातील विजपुरवठा खंडीत