नवी दिल्ली : बंगालच्या खाडीत निर्माण झालेलं चक्रीवादळ अॅम्फान आज (20 मे) पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हतिया बेटाजवळ धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वादळाचा वेग प्रतितास 185 किमी असू शकतो. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूरसह तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील जिल्हे हाय अलर्टवर आहेत.


चक्रीवादळ अॅम्फान मंगळवारी (19 मे) अंशत: कमकुवत झालं असलं तरी धोका टळलेला नाही. पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांचं नुकसान होईल, एवढी ताकद या चक्रीवादळात अद्याप आहे. त्यामुळे या दोन राज्यांमधील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.


पश्चिम बंगालच्या दीघा किनाऱ्यापासून 510 किमी अंतरावर बंगालच्या खाडीत या चक्रीवादळाचं केंद्र आहे. त्यामुळे हे वादळ उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अधिक सतर्कता बाळगली जात आहे.


अमित शाहांची ममता बॅनर्जी यांच्याशी बातचीत
चक्रीवादळाचा धोका पाहता राज्य सरकारांसह केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बाचतीच करुन केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. दुसरीकडे कोलकातामध्ये चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला असून पाऊस सुरु आहे. बंगालमध्ये भूस्खलनाची शक्यताही वर्तवली जात आहे.


हवामान केंद्राच्या संचालकांनी काय सांगितलं?
अॅम्फानचं केंद्र पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत होतं, जे पारादीप (ओदिशा) पासून सुमारे 420 किलोमीटर दक्षिण, दीघापासून 570 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि बांगलादेशच्या खेपुपारापासून 700 किलोमीटर दक्षिण-दक्षिण पश्चिम भागात आहे, अशी माहिती भुवनेश्वर हवामान केंद्राचे संचालक एच आर विश्वास यांनी मंगळवारी सकाळी दिली होती.


ते म्हणाले की, "चक्रीवादळ अंशत: कमकुवत झालं आहे. हे वादळ उत्तर-उत्तरपूर्वच्या दिशेला बंगालच्या खाडीवर पोहोचण्याची आणि बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशमधील हटिया बेटावरुन जाण्याची शक्यता आहे. या वादळाच्या वेळी हवेचा वेग 155 ते 165 किलोमीटर प्रतितास कायम राहिल. तर अधूनमधून हा वेग 180 किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढू शकतो."


एनडीआरएफची 41 पथकं तैनात
अॅम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये आतापर्यंत एनडीआरएफची एकूण 41 पथकं तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी मंगळवार (19 मे) नवी दिल्लीत सांगितलं की, "अॅम्फान चक्रीवादळाच्या रुपात हे दुसरं संकट आहे. कारण आपण आधीच कोरोना व्हायरसचा सामन करत आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. अॅम्फानमुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या एकूण 41 पथकं तैनात करण्यात आली आहे."


ओदिशाच्या सात जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची 15 पथकं तैनात करण्यात आली आहे. तर पाच पथकं तयारी ठेवली आहेत. पश्चिम बंगालच्या सहा जिल्ह्यात 19 पथकं तैनात असून दोन पथकं तयार ठेवली आहेत. अॅम्फान 20 मे रोजी धडकेल त्यावेळी जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे, असं एस एन प्रधान यांनी सांगितलं.