मुंबई : नोटाबंदी लागू करण्यापूर्वी चलनात जितक्या नोटा होत्या, तितक्या नोटा आता पुन्हा बाजारात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात समोर आली आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदी लागू केली होती. म्हणजेच जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी 17.97 लाख कोटी रुपये चलनात होते, आज दीडच वर्षात यापैकी जवळपास सर्व म्हणजेच 17 लाख 78 हजार कोटी रुपये पुन्हा चलनात आले आहेत.

नोटाबंदी केली तेव्हा एका रात्रीत पाचशे आणि एक हजाराच्या नोटा अवैध ठरवल्या, त्यामुळे जवळपास 86 टक्के चलन बाद झालं होतं. यामुळे काळा पैसा बाहेर येईल, करचोरी थांबेल, बनावट नोटांचं प्रमाण घटेल, दहशतवादाला आळा बसेल अशी अनेक कारणं दिली होती. प्रत्यक्षात मात्र त्या जुन्या नोटांपैकी 99 टक्के नोटा परत बँकेकडे जमा झाल्या, हा भाग निराळा.

तेव्हा 'लेस कॅश' आणि 'कॅशलेस' अर्थव्यवस्था अशी मांडणी केली गेली होती, कमी कॅश हातात असणं चांगलं असंही सांगितलं गेलं,  मात्र पुन्हा झालेला चलन सुळसुळाट बघता ती मांडणी फोल ठरली आहे, असं या ताज्या आकडेवारीच्या आधारे म्हणता येईल.